शशिकांत पवार
नगर तालुका: भीषण दुष्काळाने शेतीच उद्ध्वस्त केली नाही तर बळीराजाच्या गोठ्यातील पशुधनाच्या जगण्याचाही प्रश्न निर्माण केला आहे. कधीकाळी हिरव्यागार पिकांनी डोलणारी शेतशिवारं, पाण्याने भरलेले तलाव आणि डोंगररांगांमध्ये मुक्तपणे बागडणारे वन्यप्राणी... याच दिवसांमध्ये आता सर्वत्र उजाड माळरान, कोरडी जमीन आणि पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती पाहायला मिळत आहे. अशा भीषण परिस्थितीत आपल्या गोठ्यातील मुक्या जनावरांना जगविण्यासाठी बळीराजाची मोठी धावपळ सुरू झाली आहे.
नगर तालुक्यातील अडीच लाखांहून अधिक पशुधनाच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विहिरींनी तळ गाठला, तलाव कोरडे पडले, शेतातील हिरवा चारा संपला आणि उपलब्ध चाऱ्याचे दरही वाढू लागले आहेत. परिणामी जनावरांचे पोट कसे भरायचे, त्यांना पाणी कुठून आणायचे आणि पुढील काही महिने त्यांची व्यवस्था कशी करायची, या विवंचनेत पशुपालक शेतकरी सापडला आहे.
शेतीतून उत्पन्न मिळण्याची आशा मावळली असली तरी गोठ्यातील जनावरे जगविण्याची आशा बळीराजाने सोडलेली नाही. शेतात शिल्लक राहिलेले बाजरीचे सरमाड, मका, वाढे यांचा मुरघास बनवून शेतकरी आगामी काही दिवस चाऱ्याचा प्रश्न मिटविण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे. सोयाबीनचा गवंडा गोळा करून ठेवण्याची लगबग सुरू आहे.
मुरघास तयार करण्यासाठी शेतकरी मिळेल त्या ठिकाणाहून हिरवा चारा, मक्याचे वाढे आणि इतर उपलब्ध वैरण जमा करीत आहेत. काही ठिकाणी चारा कापणे, त्याची कुट्टी करणे आणि योग्य पद्धतीने साठवणूक करणे यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य हातभार लावत आहेत. आज मिळणारा थोडासा चारा उद्याच्या संकटात उपयोगी पडेल, या आशेने प्रत्येक शेतकरी धडपडताना दिसत आहे.
ज्या पशुधनाच्या भरवशावर शेतकऱ्याचा संसार चालतो शेतीला बळ मिळते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चक्र फिरते. त्याच पशुधनाला आज जगविण्यासाठी बळीराजाला संघर्ष करावा लागत आहे. अपुऱ्या चारा-पाण्यामुळे जनावरांची प्रकृती खालावताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. गोठ्यातील जनावरांच्या अवस्थेकडे पाहून शेतकऱ्याचे काळीज हेलावते. मात्र स्वतःच्या पोटापेक्षाही मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याची चिंता त्याला अधिक सतावत आहे.
शेतीचे नुकसान, दुसरीकडे पाण्यासाठी टँकरवर अवलंबित्व आणि आता पशुधनाच्या चाऱ्याची चिंता अशा तिहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. पावसाळ्यात हिरवागार दिसणारा निसर्ग यंदा दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघाला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या परीने चारा साठविण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी एवढ्या मोठ्या पशुधनाची गरज भागविणे एकट्या शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे शासनाने चारा डेपो, पशुधनासाठी पाणीपुरवठा आणि आवश्यक मदत याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा पशुपालक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. बहुतांश मुरघासासाठी उपलब्ध चारा हा दुसऱ्या तालुक्यातून आणावा लागत आहे त्याचा खर्चही मोठा होत आहे.
अडीच लाख पशुधनाच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर
नगर तालुक्यातील अडीच लाखांहून अधिक पशुधनाला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. कोरडे पडलेले तलाव, तळ गाठलेल्या विहिरी आणि संपत चाललेला चारा यामुळे पशुपालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शेतकरी स्वखर्चाने मुरघास तयार करून चारा साठविण्याचा प्रयत्न करत असले, तरी एवढ्या मोठ्या पशुधनाची गरज भागविणे कठीण बनले आहे. शासनाने चारा डेपो आणि पाणीपुरवठ्याबाबत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
स्वतःच्या घासापेक्षा जनावरांच्या चाऱ्याची चिंता !
दुष्काळाने शेती उद्ध्वस्त केली हाताला काम उरले नाही आणि घरात आर्थिक चणचण निर्माण झाली. तरीही बळीराजा आपल्या गोठ्यातील मुक्या जनावरांना जगविण्यासाठी धडपडत आहे. स्वतःच्या पोटाची चिंता बाजूला ठेवून बाजरीचे सरमाड, मका,उसाचे वाढे यांचा मुरघास तर सोयाबीनचा भुसा साठविण्याची लगबग सुरू आहे. मुक्या जीवांचे हाल पाहण्यापेक्षा मिळेल त्या चाऱ्याची तजवीज करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.