Education Pudhari
अहिल्यानगर

Rahuri Pattern: नगरचा ‘राहुरी पॅटर्न’ राज्यात चर्चेत; शैक्षणिक धोरण ठरतंय मार्गदर्शक

मिशन आपुलकी व मिशन आरंभानंतर आता वर्तुळाकार बैठक पद्धतीचा अभिनव प्रयोग; शिक्षण मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

नगर : गेल्या काही दिवसांपासून नगरची शैक्षणिक धोरणे, वेगवेगळी उपकरणे ही राज्यासाठी दिशादर्शक ठरताना दिसत आहेत. मिशन आपुलकी, मिशन आरंभ पाठोपाठ आता राहुरीच्या येवले आखाडा येथील मराठी शाळेने केरळच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना वर्तूळाकार बसवून राबवलेला ‌‘राहुरी पॅटर्न‌’ आज विधानसभेत लक्ष वेधणारा ठरला. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी राहुरी प्रमाणे राज्यात वर्तूळाकार बैठक व्यवस्था करण्यासाठी जागेची तपासणी करण्याबाबत सकारात्मक दर्शवल्याचे दिसले.

जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, त्यावेळचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी जिल्ह्यात ‌‘मिशन आपुलकी‌’ सुरू केली. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, लेखाधिकारी रमेश कासार यांनी लोकसहभाग, सीएसआर फंडातून शाळांचा अक्षरशः कायापालट केला. उपक्रमातून 50 कोटीच्या लोकसहभागाचा टप्पा दृष्टीक्षेपात आहे. सध्याचे सीईओ आनंद भंडारी, अतिरीक्त सीईओ विजय मुळीय यांनी पिशन आपुलकीसोबतच मिशन आरंभ ही शिष्यवृत्तीची तयारी करून घेणाऱ्या चाचणी परीक्षेवर आणखी जोर दिला आहे. यातून विद्यार्थ्यांना उद्याच्या स्पर्धा परीक्षेचीही ओळख झाली आहे. त्यांचा आत्मविश्वासही वाढत आहे. त्यामुळे मिशन आरंभ हा गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा श्रीगणेशा करणारा ठरत आहे.

‌‘राहुरी‌’ची विद्यार्थी बैठक -व्यवस्था तारांकीत

दरम्यान, नगरचे शैक्षणिक धोरणे राज्यासाठी दिशा दाखवणारे ठरत असताना, कालच्या तारांकीत प्रश्नांच्या यादीत पुन्हा एकदा नगरच्या शैक्षणिक धोरणाचे कौतुक होताना दिसले. आमदार धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाच्या व अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये एकामागे एक बेंच लावून बैठक व्यवस्था केलेली आहे. पाठीमागे बसणाऱ्या विद्यार्थ्याच्या मनात बॅक बेंचर असा न्यूनगंड निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधले असता, त्यावर शिक्षण मंत्री दादाजी भुसे उत्तरात म्हणतात, राज्यात राहुरी नगरपालिकेच्या येवले आखाडा नूतन मराठी शाळेमध्ये पारंपारीक बैठकीऐवजी वर्तुळाकार बैठक पद्धतीचा अवलंब केला आहे. या पॅटर्ननुसार विद्यार्थी केंद्रीत संवादात्मक शिक्षणाचा प्रयोग यशस्वीपणे राबवला जात आहे.

वर्तूळाकार बैठक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास तसेच शिकण्याची सकारात्मक वाढत असल्याचेही त्यांचे निरीक्षण आहे. सर्व शाळांमध्ये अशा वर्तुळाकार बैठक व्यवस्था करण्यासाठी अगोदर जागेची अडचण आहे. त्यामुळे वर्तुळाकार व्यवस्था कशाप्रकारे करता येईल, हे तपासण्याची गरज असल्याचेही शिक्षण मंत्र्यांनी म्हटले.त्यामुळे येणाऱ्या काळात जागांची अडचण ज्या ठिकाणी नाही, त्या ठिकाणी केरळच्या धर्तीवरील ‌‘राहुरी पॅटर्न‌’ राबवला जाणार का, याकडे लक्ष असणार आहे.

शासन आदेशात ‌‘नगर‌’ची छाप

‌‘मिशन आपुलकी‌’ची राज्य सरकारनेही दखल घेतली. काही दिवसांपूर्वीच शिक्षणाधिकारी भास्कर पाटील तसेच त्यांच्या टीमला मुंबईत बोलावून नगरचा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी कसा राबवता येईल, याबाबत माहिती जाणून घेतली. एका शिक्षण विभागाच्या शासन आदेशात नगरच्याही काही बाबींचा प्रकर्षाने समावेश करण्यात आल्याचे समजते.

आता अमरावती झेडपीतही मिशन आरंभ

‌‘मिशन आरंभ‌’मुळे शिष्यवृत्तीचा वाढता टक्क्का पाहता नगरपाठोपाठ आता अमरावती जिल्हा परिषदेनेही मिशन आरंभ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याठिकाणी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हा उपक्रम राबविण्याबाबत सूचना केल्याचे समजले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT