नगर: जिल्ह्यातील नगरपालिकांच्या विजयी उमेदवारांचे सत्कार, स्वागत सुरुच असून, बहुतांश नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी पदभारदेखील स्वीकारत कामकाजास प्रारंभ केला आहे. आता उपनगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी नगराध्यक्षच पहिली विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करणार आहेत. ज्या त्या नगराध्यक्षांच्या सवडीनुसार उपनगराध्यक्षपद निवडीची तारीख ठरणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, राहाता, राहुरी, शिर्डी, देवळाली प्रवरा या अकरा नगरपालिका व नेवासा नगरपंचायत आदी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होअन 21 डिसेंबरला निकाल जाहीर झाला आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर ोअन दहा दिवसांचा अवधी उलटला आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांचे शहरभरात ठिकठिकाणी जोरदार स्वागत झाले. बहुतांश जणांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारत कामकाज देखील सुरु केले आहे.
नगरपालिकेवर ज्या पक्षाचे अधिक बलाबल आहे. त्या पक्षांतील नवनिर्वाचित नगरसेवकांत मात्र धाकधूक वाढली आहे. उपनगराध्यक्ष या महत्त्वपूर्ण पदावर आपली वर्णी लागावी यासाठी ज्येष्ठ नगरसेवकांची फिल्डींग सुरु झाली आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलविण्याचा अधिकार नगराध्यक्षांना आहे. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत समान मते मिळाल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार नगराध्यक्षांना आहे.
येत्या एक दोन दिवसांत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुका घेण्याबाबत नूतन नगराध्यक्षांना पत्र देणार आहेत. त्यानंतर बारा पालिकांचे नगराध्यक्ष आपापल्या सवडीनुसार उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत.
दोन्ही पदांवर काम करणाऱ्या महिला
एकच व्यक्ती नगराध्यक्ष व नगरसेवक या दोन्ही पदावर विजयी झाल्यानंतर त्या व्यक्तीला नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा लागत होता. शासनाने यामध्ये नुकताच बदल केला असून, आता दोन्ही पदे कायम ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांना आता दोन्ही पदावर राहाता येणार आहे. दोन्ही पदांवर काम करण्याची संधी मिळालेल्या जिल्ह्यातील त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.