नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील समन्वयातून, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यातून व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. घुले यांच्या निवडीमुळे आता जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे.
स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सोमवारी बँकेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सभागृहात संचालक मंडळाची बैठक झाली. उपनिबंधक मंगेश सुरवसे अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षपदासाठी चंद्रशेखर घुले यांच्या नावाची सूचना अंबादास पिसाळ यांनी मांडली. प्रशांत गायकवाड यांनी अनुमोदन दिले. घुले यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची रीतसर निवड झाल्याची घोषणा सभेचे अध्यक्ष मंगेश सुरवसे यांनी केली.
निवड प्रक्रिया संपल्यानंतर पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे यांनी घुले यांचा सत्कार केला.
पालकमंत्री विखे पाटील यांचा सत्कार बँकेच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केला. याप्रसंगी ॲड. माधवराव कानवडे, माजी मंत्री तथा आमदार शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार राहुल जगताप, माजी अध्यक्ष सीताराम गायकर, संचालक अरुण तनपुरे, अंबादास पिसाळ, प्रशांत गायकवाड, गणपतराव सांगळे, अमोल राळेभात, अमित भांगरे, करण ससाणे, अनुराधा नागवडे, आशाताई तापकीर, शेवगावचे सभापती क्षितिज घुले, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, संजय कोळगे, काकासाहेब नरवडे आदी उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी आभार मानले.
श्रेष्ठींच्या सल्ल्याने व सहकार्याने बँकेच्या अध्यक्षपदी घुले पाटील यांची निवड झाली आहे. बँकेस मोठी परंपरा आहे. बँक नेहमीच शेतकरी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रश्न सोडवण्यात अग्रेसर असते. चंद्रशेखर घुले पाटील यांना मोठा अनुभव असल्याने त्याचा बँकेस फायदा होईल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.फोन फिरले अन् घुलेंचा मार्ग सुकर!
बँकेच्या अध्यक्षपदाची संधी ही ‘ठरल्याप्रमाणे’ राष्ट्रवादीकडे असावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशीही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखविताना पालकमंत्री विखे पाटील यांना तशी माहिती दिली होती. तसेच अजित पवार यांनीही स्वतः संचालकांना फोन केले. या प्रक्रियेत विखे पाटलांनी पुढाकार घेत चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड केली, अशी कुजबूज संचालकांमधून ऐकावयास मिळाली.
बँकेच्या संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास ठेवून माझी अध्यक्षपदी निवड केली आहे. मी सर्व संचालकांचे आभार मानतो. बँकेस मोठा वारसा असून त्यास पात्र राहूनच बँकेचा कारभार करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेही विशेष आभार.चंद्रशेखर घुले पाटील, नवनिर्वाचित अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड