

कर्जत : कर्जत शहरातील शारदानगर परिसरामध्ये धाडसी चोरी झाल्याने नागरिकांत भिती पसरली आहे. वृद्ध महिलेस मारहाण करून 50 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत कर्जत शहरातीलच दोघाजणांना अटक केली असून ,त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती सूत्रांनी दिली.
शहरातील शारदानगरमधील राजूबाई हंबाडे (वय 68) आणि गिताबाई भगत या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेल्या होत्या. रात्री साडेदहा वाजता त्या परत आल्या तेव्हा घराच्या कडी, कोयंडा तुटलेला दिसला. घरामध्ये आवाज येत असल्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून घरामध्ये चोरी करत असणारे दोघेजण बाहेर पळत आले. चोरट्यांनी राजूबाई हंबाडे यांना जोरदार धक्का दिल्याने त्या खाली पडल्या. तीच संधी साधत चोरटे पसार झाले. दरम्यान हंबाडे यांचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. घरात सामानाची उचकापाचक करण्यात आल्याचे दिसून आले. कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेले 50 हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याची फिर्याद हंबाडे यांनी पोलिसात दिली.
कर्जतचे पोलिस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने चोरट्यांचा मागमूस शोधला. शहरातील कौस्तुभ भानुदास क्षीरसागर राहणार वीर वस्ती व अभिषेक प्रवीण जगताप या दोघांना अटक करून ताब्यात घेतले.
यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेले 50 हजार रुपयेही त्यांनी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिरसाठ यांनी दिली.