Municipal Election Nomination Pudhari
अहिल्यानगर

Municipal Election Nomination: उमेदवाराभोवती सूचक-अनुमोदकाच्या अटीची तटबंदी

दोघेही त्याच प्रभागातील मतदार असणे अनिवार्य : राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश

पुढारी वृत्तसेवा

नगर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित महापालिकेच्या मतदारयादीत असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवाराचे सूचक व अनुमोदकही उमेदवार निवडणूक लढवीत असलेल्या प्रभागातील असणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

अहिल्यानगरसह राज्यातील महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. प्रचार कालावधी, जाहिरात निर्बंध तसेच उमेदवारी प्रक्रियेबाबतच्या महत्त्वाच्या अटी स्पष्ट केल्या. महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची मुदत 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, मुद्रित माध्यमे तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. या कालावधीनंतर कोणत्याही स्वरूपाचा प्रचार आचारसंहितेचा भंग ठरणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.

दरम्यान, उमेदवारी प्रक्रियेबाबत विविध नियम स्पष्ट आयोगाने केले. इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित महापालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मात्र, उमेदवारासाठी सूचक व अनुमोदक हे उमेदवार ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहे, त्याच प्रभागातील मतदार असणे बंधनकारक आहे. पक्षीय उमेदवार तसेच अपक्ष उमेदवार या दोघांनाही प्रत्येकी एक सूचक व एक अनुमोदक आवश्यक असून, उमेदवार एकापेक्षा अधिक प्रभागांत नामनिर्देशनपत्र दाखल करू शकतो. निवडणूक प्रक्रियेतील या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार असून, उमेदवार व राजकीय पक्षांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

एकाच प्रभागात दोन ठिकाणी लढण्यास मनार्ई

इच्छुक उमेदवार एका वेळी अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी करू शकतो, मात्र त्याला एकाच प्रभागात दोन जागांवर उमेदवारी करता येणार नाही. त्याला कोणत्याही (अ, ब, क किंवा ड) एकाच जागेवर उमेदवारी करता येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच, एका जागेसाठी कमाल चार उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

एकच ‌‘ना हरकत‌’ चालणार अनेक उमेदवारी अर्जांना

महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांना महापालिकेच्या विविध विभागांतून ‌‘ना हरकत‌’ प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे. मात्र, दोन अर्ज भरायचे असतील तर किती ना हरकत प्रमाणपत्र लागणार, अशी शंका इच्छुक उमेदवारांना होती. मात्र, इच्छुक उमेदवार एका ना हरकत प्रमाणपत्र काढून त्याची द्वितीय प्रत अन्य अर्जांना जोडू शकतात, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT