नगर: मोठ्या प्रतीक्षेनंतर मान्सूनने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा आदी तालुक्यांसह विविध भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने बेजार झालेल्या नागरिकांना आणि पेरणीसाठी चातकासारखी वाट पाहणार्या बळीराजाला काहींसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या २४ दिवसांत सरासरी ८० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना फक्त २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बहुतांश तालुक्यांत ५ मिलिमीटरदेखील पावसाची नोंद नाही. पेरणीजोगा पाऊस नसल्याने खरीप पेरणी रखडली आहे. त्यामुळे जिल्हाभरात चिंतेचे वातावरण आहे.
मंगळवारी (दि.२३) मान्सूनचे आगमन झाले. अहिल्यानगर शहरात दुपारी पावसाने हजेरी लावली. संगमनेर शहरासह तालुक्यात पाऊस झाला. राहाता तालुक्यातील लोणी, कोल्हार, बाभळेश्वरसह काही गावांत पाऊस झाला. श्रीरामपूर तालुक्यात शहरासह काही गावांत, तसेच राहुरी, नेवासा तालुक्यांत पावसाने हजेरी लावली.
दरम्यान मंगळवारी (दि.२३) सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेवगाव तालुक्यात सरासरी ५.८, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येकी २.९, कर्जत ३.४, संगमनेर १, कोपरगाव ३.४ तर राहाता तालुक्यात १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.