Mohatadevi Temple Pudhari
अहिल्यानगर

Mohatadevi Temple: दिवाळी पाडवा, भाऊबीजेला मोहटादेवी गडावर भाविकांचा भक्तिसागर; नियोजनामुळे सुलभ दर्शन

हजारो भाविकांची गर्दी; ३० फुटी रस्ता, प्रशस्त वाहनतळ, दर्शन रांगा आणि लिफ्ट-व्हीलचेअर सुविधांमुळे भाविकांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या पावन पर्वावर भाविकांचा अक्षरशः भक्तिसागर लोटला होता. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी आई जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर गर्दी केली होती. विशेषतः भाऊबीजेनिमित्त माहेरी आलेल्या भगिनींनी आपल्या भावांच्या दीर्घायुष्याचे, सुख-समृद्धीचे साकडे मोहटामातेच्या चरणी घातले. 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषाने संपूर्ण गड परिसर भक्तिमय झाला होता.

दिवाळीच्या कालावधीत मोहटामातेचे दर्शन घेतल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात, मनाला अपार शांती मिळते आणि पुढील जीवनप्रवास सुखकर होतो, अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या.दरम्यान, यंदा भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाचा मोठा फायदा झाला. गडावर नव्याने साकारण्यात आलेला ३० फुटी भव्य रस्ता आणि एकाच वेळी हजारो वाहने सामावून घेणाऱ्या प्रशस्त वाहनतळामुळे भाविकांची वाहनांसह ये-जा सुलभ झाली. वाहने थेट गडावर पोहोचण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने वाहतुकीचा खोळंबा टाळण्यास मदत झाली. मंदिराकडे येणारे सर्व रस्ते वाहनांनी गजबजले असतानाही नियोजनामुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत राहिला.

मंदिर परिसरात मोठी गर्दी असूनही भाविकांना शांततेत आणि सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी दर्शन रांगांचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. परिणामी, गर्दीचा मोठा ओघ असतानाही दर्शन रांगा शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत होत्या. प्रत्येक भाविकाला आई जगदंबेचे दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थानचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक सेवाभावी वृत्तीने कार्यरत होते.गडावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि आजारी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आधुनिक लिफ्ट आणि व्हीलचेअरची सुविधा विशेष दिलासादायक ठरली.

देवस्थानचे कर्मचारी व सुरक्षा रक्षक स्वतः पुढाकार घेऊन अशा भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचविण्यास मदत करत होते. त्यामुळे वयोवृद्ध, दिव्यांग आणि आजारी भाविकांनाही कोणताही त्रास न होता आई जगदंबेचे दर्शन घेता आले. गर्दीच्या काळातही या भाविकांच्या चेहऱ्यावर दर्शनाचा आनंद आणि समाधान दिसून येत होते.

विक्रमी गर्दीचे यशस्वी व्यवस्थापन करत प्रत्येक भाविकाला सुलभ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल देवस्थान समितीच्या भाविकस्नेही नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी गर्दी व इतर व्यवस्थापनासाठी देवस्थानचे विश्वस्त बाबासाहेब दहिफळे, शुभम दहिफळे, शशिकांत दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे आणि जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT