गोरक्ष शेजूळ
नगर : जिल्ह्यात मुली आणि महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांनी गंभीर वळण घेतले आहे. नोव्हेंबरमध्येच गेल्या 26 दिवसांत 143 मुली व महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती ‘क्राईम रीव्ह्यू’वरून समोर आली आहे. विशेष म्हणजे, 14 ते 30 वयोगटातील या मुली व महिला आहेत. विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्याबाबत हरवल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
‘क्राईम रीव्ह्यू’ या संकेतस्थळावर पोलिस रोजच्या घटना-घडामोडींची माहिती देतात. त्यात दाखल गुन्ह्यांच्याही नोंदी असतात. यावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातून गेल्या 1 नोव्हेंबरपासून 172 व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद असून, त्यात 14 ते 30 वयोगटातील मुली व महिलांचीच संख्या सर्वाधिक म्हणजे 143 नोंदविण्यात आली आहे. याचाच अर्थ दिवसाला सरासरी सहा मुली-महिला बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात घरगुती कलह, रागाच्या भरात घर सोडणे, प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष, सोशल मीडियावर वाढलेल्या ओळखी या कारणांमुळे मुली कोणालाही न सांगता थेट घराबाहेर पडत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे 14 ते 30 वर्षे वयोगटातील मुली आणि महिलांचे प्रमाण जास्त असून ही बाब अधिक चिंताजनक मानली जात आहे.
मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना मुलांवर लक्ष ठेवण्याचे, तसेच मित्र बनून त्यांच्याशी हितगूज करतानाच, त्यांच्यामध्ये चांगल्या, वाईट प्रवृत्तीबाबत जागृती करण्याचेही आवाहन केले आहे. यातून, शाळा महाविद्यालयात जनजागृती, प्रबोधन करण्याची मागणी पुढे येत आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेत तातडीने शोधमोहीम गतिमान, प्रकरणांचे वर्गीकरण, तसेच प्रत्येक बेपत्ता मुलीच्या कुटुंबीयांशी नियमित संपर्क ठेवण्याचे आदेश संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत. काही मुलींचा शोध लागला असला तरी बहुतांश प्रकरणे अद्याप अनुत्तरित असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जिल्ह्यात अनेक पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून अल्पवयीन तसेच 18 वय पूर्ण झालेल्या मुली बेपत्ता होण्याच्या नोंदी आहेत. यात, राहुरी पोलिस स्टेशनच्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत गेल्या 22 महिन्यांत 96 पेक्षा अधिक मुलींचा शोध घेऊन त्यांना पुन्हा पालकांकडे सुखरूप सोपविल्याचे दिसले.
जिल्ह्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवले जाते. शिवाय 18 वर्षाखालील बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांची सात पथकेही तैनात आहेत. अन्य मिसिंगचाही दर आठवड्याला आढावा घेतला जातो. पोलिस प्रशासन दक्ष आहेच, मात्र पालकांनीही पाल्यांच्या सोशल माध्यमांच्या वापरावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर