Shrigonda Maratha Reservation Pudhari
अहिल्यानगर

Manoj Jarange: मनोज जरांगे यांचा श्रीगोंदा दौरा लांबणीवर; तब्येत खालावल्याने पाटोद्यातच मुक्काम

जय्यत तयारीनंतरही आगमन न झाल्याने मराठा बांधवांचा हिरमोड; बाजारतळावर रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम

पुढारी वृत्तसेवा

श्रीगोंदा: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या श्रीगोंदा दौऱ्यासाठी संपूर्ण तालुक्यात जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या प्रवास आणि उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावल्याने त्यांचा आजचा मुक्काम पाटोदा येथेच ठेवण्यात आला. या माहितीमुळे श्रीगोंद्यात उत्साहात तयारी करणाऱ्या मराठा बांधवांचा काहीसा हिरमोड झाला असला, तरी जरांगे कधी येतात याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

मनोज जरांगे मंगळवार (दि. १५) पासून पाटोदा येथे मुक्कामी आहेत. बुधवारी (दि. १६) सायंकाळी ते श्रीगोंदा येथे बाजारतळ परिसरात येणार होते. त्यानुसार तेथे भव्य मंडप, ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस प्रशासनानेही ३५० पोलिसांचा बंदोबस्त लावला होता.

जरांगे यांच्या स्वागतासाठी हा केवळ शहराचा कार्यक्रम न राहता तो संपूर्ण तालुक्याचा स्वयंस्फूर्त सोहळा बनला होता. प्रत्येक गावातील समाजबांधवांनी आपापल्या परीने भाकरी, भाजी, पाणी, चहाचे नियोजन केले होते. मात्र, सायंकाळपर्यंत कुठलाच निरोप आला नाही.

बाजारतळावर गर्दी कायम

जरी मुक्काम पाटोद्यात असला, तरी श्रीगोंदेकरांनी तयारी गुंडाळली नाही. ज्या ठिकाणी पाटील थांबणार होते, तिथे बांधवांची गर्दी तशीच होती. ‘जरांगे आज रात्री उशिरा आले तरी आम्ही इथेच थांबणार, त्यांना भेटल्याशिवाय जाणार नाही,’ अशी भावना अनेक तरुणांनी व्यक्त केली.

दरम्यान, श्रीगोंदा शहरातील बालाजी मंगल कार्यालयात मराठा बांधवासाठी जेवणाची व्यवस्था केली होती. आढळगाव येथील बांधवांनी सकाळपासूनच मोठी तयारी केली होती. रस्त्याच्या बाजूला जरांगे यांच्या स्वागताचे बोर्ड लावले आहेत. श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तांदळी ग्रामस्थांचे त्यात योगदान राहिले.

ठरलेल्या मार्गानेच मुंबईकडे कूच

जरांगे दुपारी १२ पर्यंत पाटोद्यातून निघाले नसल्याची माहिती आली आणि त्यांची तब्येत बिघडल्याचे समजले. त्यानंतर श्रीगोंद्यातील वातावरणात चिंता पसरली. कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासून सतत फोनाफोनी सुरू होती. अंतरवाली सराटी, पाटोदा आणि श्रीगोंदा अशा तिन्ही ठिकाणच्या समन्वयकांना सारखे फोन लावले जात होते. सोशल मीडियावरही प्रत्येक मिनिटाला अपडेट घेतले जात होते. मात्र, सायंकाळी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी (दि. १७) दुपारी एक वाजता मुंबईकडे निघणार असल्याचे स्पष्ट केले. ठरलेल्या मार्गानेच ते मुंबईकडे जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT