

नगर: पावसाअभावी पाथर्डी व शेवगाव तालुक्यांतील बहुतांश गावांत टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. नजर अंदाज पैसेवारीत या दोन्ही तालुक्यांतील २५१ गावांतील खरीप पिके वाया गेल्याचे पुढे आले आहे. या सर्व गावांतील पैसेवारी ५० पेक्षा कमी आली आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील १३७ तर शेवगाव तालुक्यातील ११४ गावांचा समावेश आहे. दरम्यान, सध्यातरी जिल्ह्यातील १३५९ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आली आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात एकूण १६१० महसुली गावे असून, त्यापैकी ५८७ गावे खरीप तर १०२३ गावे रब्बी हंगामी आहेत. खरीप पेरणी झाल्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत खरीप पिकांची परिस्थिती कशी आहे. याची बांधावरून पाहणी करून पैसेवारी निश्चित केली जाते. यासाठी ‘नजर अंदाज पैसेवारी’ ही मोहिम राबवली जाते. आहे.
जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.१५) खरीप हंगामातील ५८७ गावांची पैसेवारी जाहीर केली असता, पाथर्डी तालुक्यातील खरीप हंगामी सर्वच सर्व ८० गावांतील पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. शेवगाव तालुक्यातील ३४ गावे खरीप हंगामी असून, या सर्व गावांतील पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहेत. जिल्हाभरात सर्वाधिक १०२३ गावे रब्बी हंगामी आहेत. पावसाळ्यात रब्बी गावांतील पैसेवारी घेतली जात नव्हती. मात्र, २०१५ पासून रब्बी गावांची पैसेवारी घेण्याचा निर्णय शासनाने जारी केला आहे.
त्यासाठी रब्बी गावांमध्ये खरीप हंगामात २/३ किंवा त्यापेक्षा अधिक जास्त क्षेत्रावर पेरणी करण्यात आली असल्यास या रब्बी गावांची सुध्दा पैसेवारी घेतली जात आहे. त्यानुसार १ हजार २३ गावांची नजर अंदाज पैसेवारी घेतली असता १३७ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील ५७ तर शेवगाव तालुक्यातील ८० गावांचा समावेश आहे. उर्वरित ८८६ रब्बी गावांची पैसेवारी मात्र ५० पैशांपेक्षा अधिक आली आहे.
‘अंतिम पैसेवारी’वर दुष्काळी परिस्थिती
नजर अंदाज पैसेवारी जाहीर झाल्यानंतर पिकांमध्ये कोणती सुधारणा झाली यासाठी ३१ ऑक्टोबर रोजी सुधारित पैसेवारी जाहीर केली जाते. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येते. ‘अंतिम’मध्ये ज्या गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी येते. त्या गावांत दुष्काळी परिस्थिती जाहीर होतो. त्यामुळे या गावांना काही दीष्काळी सवलती जाहीर केल्या जातात. त्यामुळे अंतिम पैसेवारीला अधिक महत्त्व आहे.