संगमनेर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिवर्तन घडवायचे आहे. पुष्कळ आरोप -प्रत्यारोप होतील, पण एकच लक्ष ठेवायचे आहे. नागरिकांनी प्रस्थापितांविरोधात काम केले, आता सर्वांनी महायुतीचा उमेदवाराच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा संकल्प करावयचा आहे. विधानसभा निवडणुकीत एका दिलाने काम केले, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शत- प्रतिशत महायुतीचाच झेंडा फडकावयाचा आहे, असा ठाम विश्वास जलसंपदा तथा, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. (Latest Ahilyanagar News)
संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे शनिवारी महायुती आयोजित दिवाळी फराळ स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, ॲड. श्रीराम गणपुले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दिनेश फटांगरे, बापूसाहेब गुळवे, सुनील कर्जतकर, जालिंदर भोर, शिरिष मुळे आदी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले की, सत्ता संघर्षाविरोधात कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केल्यामुळे परिवर्तन घडवून, अनोखी भेट संगमनेर तालुक्याला दिली. एक सामान्य कार्यकर्ता अमोल खताळ यांच्या रूपाने आमदार मिळाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिवर्तन घडवायचे आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. प्रास्ताविकात आमदार खताळ म्हणाले की गेल्या तब्बल 40 वर्षांनंतर मला व्यासपीठ उपलब्ध झाले. आता दरवर्षी सणोत्सव साजरा केला जाणार आहे.
सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्यामुळेचं येथे परिवर्तन झाले. पालकमंत्री विखेंच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विविध विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला. तालुक्याला दादागिरी- दहशतीपासून संरक्षण मिळवून दिले. आमच्याकडे साखर कारखाना, दूध संघ किंवा सोसायट्यांचे कर्मचारी नाहीत. पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिकेवरही महायुतीचाच भगवा फडकवायचा आहे. दोन टीएमसी भोजापूरचे पाणी तळेगावसह परिसरातील दुष्काळी भागाला मिळाले. साकुर पठार भागाचा पाणी प्रश्न लवकरचं मार्गी लागणार आहे, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन स्मिता गुणे यांनी केले.
मामा टेकावले.. भाच्यालासुद्धा टेकवायचे आहे..!
संगमनेर तालुका विकासाचं मॉडेल करून दाखवणार आहे. आता जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. सत्ताधारी आमदारांनाच निधी मिळतो, मात्र काहीजण पत्रक काढून निधी मिळाल्याचे खोटे सांगतात. मामा टेकावले आता भाच्यालासुद्धा टेकवायचे आहे, असा सूचक इशारा माजी मंत्री बाळासाहेब थोरात व भाचे विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांचा नामोल्लेख टाळून आमदार अमोल खताळ यांनी दिला. दरम्यान, संगमनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे केले. लवकरचं आर्थिक मदत दिली जाणार आहे, असे आमदार अमोल खताळ म्हणाले.
काहीजण ‘ईव्हीएम’ मशिनच्या नावाने नाहक आरडा- ओरड करतात. मनसे प्रमुख राज ठाकरेंना पुढे करून, पराभव झाकत आहेत, मात्र आता त्यांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारला पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोगस मतदान रोखण्याची जबाबदारी महायुतीच्या कार्यकर्त्यांची आहे.आमदार अमोल खताळ, संगमनेर.
नेमकं काय होणार..?
संगमनेर शहरातील महायुतीच्या दिवाळी फराळ मेळाव्याच्या कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरातांवर खरपुस टीका केली, परंतू पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, मात्र थोरातांवर कुठल्याही प्रकारची टीका न केल्यामुळे अनेकांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेमकं काय होणार, याची उत्सुकता लागली आहे.