गोरक्ष शेजूळ
अहिल्यानगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर आणि आचारसंहितेच्या अगदी तोंडावर जिल्हा परिषदेतून सुमारे 155 कोटींच्या 1443 विकासकामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे गट आणि गणांत विकासकामांच्या भूमिपूजनासोबतच जणू महायुतीच्या प्रचाराचेही नारळ फोडले जात आहे.(Latest Ahilyanagar News)
भाजपाचे मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला हा मास्टर स्ट्रोक दिल्याचे बोलले जात आहे.जिल्हा परिषदेला स्थानिक विकासाचे केंद्रबिंदू संबोधले जाते. राजकारणामध्ये हा केंद्रबिंदू आपल्या ताब्यात असावा, ही प्रत्येक पक्षाची धारणा असते. त्यामुळे आगामी काळातही मिनी मंत्रालयाची सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दुरदृष्टीमुळे जिल्ह्यात महायुती ही दोन पाऊले पुढेच दिसत आहे. ज्या ठिकाणी महाविकास आघाडीतील मरगळ अद्याप दूर झाली नसताना, दुसरीकडे महायुतीकडून गटागणांत उत्साहात नारळं फोडले जात असल्याचे दिसते आहे.
पालकमंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रशासक आनंद भंडारी यांनी अनेक कामांना प्रशासकीय मंजूऱ्या दिल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून (दलित) नवबौद्ध वस्त्यांमधील रस्ते, गटार, विजेची अशी 40 कोटींची 599 कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांतून विकासाची वाहती गंगा गावखेड्यात वसलेल्या नवबौद्ध वस्तीपर्यंत पोहचवली जात आहे.लेखाशिर्ष 3054 अंतर्गत जि.प. उत्तर व दक्षिण बांधकाम विभागातून 167 कामे मंजूर करण्यात आली असून, त्यासाठी 36.77 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून गावांगावातील रखडलेली अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत.
नागरी सुविधाअंतर्गत 308 कामे मंजूर करण्यात आली असून, त्यासाठी 32 कोटी 33 लाखांची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. जनसुविधेतून 309 कामे घेतली आहे, त्यासाठी 29 कोटी 24 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. यामध्ये स्मशानभूमी सुशोभीकरण, रस्ते, इमारती अशी कामे उभी राहणार आहेत. तसेच तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी 60 कामे मंजूर केली असून, त्याकरीता 9 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे समजले आहे. यातून तीर्थक्षेत्रांचा विकास साध्य केला जाणार आहे. यातून काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटनाचीही संधी मिळणार आहे.
एकूणच, अगदी निवडणुका जवळ आल्याने होणारे विकासकामांचे भूमिपूजन सत्ताधारी महायुतीसाठी फायदेशीर ठरणारे आहेत. या माध्यमातून इच्छूकांना जनतेपर्यंत पोहचता येणार असल्याने महायुतीचा विरोधकांसाठी हा मास्टरस्ट्रोक समजला जात आहे.