अहिल्यानगर : वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणासह इतर धोरणात्मक मागण्यांसाठी राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या वतीने गुरुवारपासून तीन दिवस संप पुकारला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. दरम्यान, महावितरण व्यवस्थापनाने वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मेस्मा लागू करण्यात आल्याने हा संप बेकायदेशीर ठरला आहे. संपकाळात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज असल्याचे महावितरणने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.(Latest Ahilyanagar News)
समांतर वीजवितरण परवाना देण्यास विरोध, 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्यास विरोध, त्याचबरोबर महापारेषण कंपनीमधील 200 कोटी रुपयांवरील प्रकल्प भांडवलदारांना देण्यास विरोध व महापारेषण कंपनीचे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्यास विरोध यांसह विविध मागण्या कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. संपात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि.9) महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महेश चाबुकस्वार, धीरज गायकवाड, राजेंद्र घोरपडे, सुशील तायडे, गणेश कुंभारे, गायकवाड डी.एस., राहुल वरंगटे, म्हस्के विजय, अनिल कुमार रोकडे, सतीश भुजबळ, धीरज भिंगारदिवे, रघुनाथ लाड आदींसह अभियंते, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा रात्रंदिवस सज्ज आहे. वीजपुरवठ्याबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास 24 तास सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सात संघटना संपात सहभाग
महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, सबऑॅर्डीनेट इंजिनियर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, तांत्रिक कामगार युनियन संपात सहभागी आहे.
संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई; पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध
संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. संप कालावधीत आपत्कालीन व्यवस्था उभारण्यात आली आहे. संपकाळात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असून, संपात सहभागी नसलेले महावितरण कर्मचारी, बाह्यस्रेोत कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचारी यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
घरगुती ग्राहकांसह पाणीपुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे महावितरणने प्रसिध्दीपत्रकात म्हटले.