संगमनेर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर, काल (बुधवार दि.8) रोजी प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. 30 नगरसेवक असलेल्या या पालिकेत 50 टक्के 15 महिला नगरसेविकांचे राज असणार आहे. यामुळे आता खऱ्या अर्थाने पालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. विशेष असे की, या आरक्षण सोडतीसाठी एकही इच्छुक महिला उपस्थित नसल्याचे दृश्य दिसले.
यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भावनात बुधवारी प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोडत काढण्यात आली. यावेळी पालिका प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार, प्रशासन अधिकारी संजय पेखळे, राजेंद्र गुंजाळ उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून पालिकेसाठी इच्छुक असलेले उमेदवार आरक्षण सोडतीकडे लक्ष लावून बसले होते. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर काल आरक्षण जाहीर झाली. यामुळे शहरात इच्छुक उमेदवारांनी प्रभागात लक्ष केंद्रित केले आहे. सर्वसाधारण 20, अनुसूचित जाती 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग 8 असे 30 नगरसेवक असणार आहे. अनेकांचे प्रभाग महिला राखीव झाल्यामुळे तसेच त्यांच्या प्रभागात राखीव जागांचे आरक्षण पडल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.
असे आरक्षण जाहीत झाल्यामुळे काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अपक्ष अशा सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी पक्षातील वरिष्ठांची मनधरणी करुन, तिकिट मागणीचा श्रीगणेशा केला आहे.
संगमनेर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. तर, पंधरा प्रभागांमधून 50 टक्के आरक्षणप्रमाणे पंधरा महिला नगरसेविकांची सत्ता येणार आहे. ‘महिलाराज’ येणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी, बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडतीसाठी एकही महिला उपस्थित नव्हती. संभाव्य इच्छुक पुरुष उमेदवारांची मात्र गर्दी दाटली होती.
प्रभाग 1 अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 1 ब - सर्वसाधारण प्रभाग 2 अ - अनुसूचित जाती, प्रभाग 2 ब - सर्वसाधारण महिला, प्रभाग 3 अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग,प्रभाग 3 ब - सर्वसाधारण महिला, प्रभाग 4 अ - सर्वसाधारण महिला, प्रभाग 4 ब - सर्वसाधारण, प्रभाग 5 अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 5 ब - सर्वसाधारण, प्रभाग 6 अ - सर्वसाधारण महिला, प्रभाग 6 ब - सर्वसाधारण, प्रभाग 7 अ - सर्वसाधारण महिला, प्रभाग 7 ब - सर्वसाधारण, प्रभाग 8 अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 8 ब - सर्वसाधारण, प्रभाग 9 अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 9 ब - सर्वसाधारण महिला, प्रभाग 10 अ - सर्वसाधारण महिला, प्रभाग 10 ब - सर्वसाधारण, प्रभाग 11 अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 11 ब - सर्वसाधारण, प्रभाग 12 अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग 12 ब - सर्वसाधारण महिला, प्रभाग 13 अ - अनुसूचित जाती महिला, प्रभाग 13 ब - सर्वसाधारण, प्रभाग 14 अ - सर्वसाधारण महिला, प्रभाग 14 ब - सर्वसाधारण, प्रभाग 15 अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग तर, प्रभाग 15 ब - सर्वसाधारण महिला