

नगर : गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल 20 गुन्ह्यांमध्ये पकडलेला 934 किलो गांजा काल विशेष मोहिमेंतर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नाश करण्यात आला. रांजणगाव (शिरूर) एमआयडीसीमध्ये या गांजाची प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यात आली.(Latest Ahilyanagar News)
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्यासंदर्भात विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. समितीच्या आदेशान्वये जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाचा आढावा घेवुन गुन्ह्याचे संबधीत तपासी अंमलदार यांचेमार्फतीने न्यायालयाकडुन मुद्देमाल नाश करण्याची परवानगी घेतली.
जामखेड, तोफखाना, राहुरी, कर्जत, पारनेर, श्रीरामपुर शहर, शेवगांव, मिरजगाव, कोपरगाव तालुका, भिंगार कॅम्प, श्रीगोंदा व राहाता पोलिस स्टेशनला अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल असलेल्या एकुण 20 गुन्ह्यातील 933 किलो 570 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा व गांजाची झाडे महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ, मुंबई यांचे नाहरकत प्रमाणपत्र घेवुन महाराष्ट्र इन्व्हीरो पॉवर लि. रांजणगाव, एम.आय.डी.सी., ता. शिरुर जि. पुणे या ठिकाणी संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन विशेष मोहिमेअंतर्गत नाश करण्यात आला आहे.पोलिस अंमलदार शामसुंदर गुजर, पंकज व्यवहारे, संतोष खैरे, अतुल लोटके, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे, जालिंदर माने, जयराम जंगले या पथकाने केली आहे.