Election Reservation: आरक्षणामुळे अनेकांचा झाला हिरमोड; इच्छुक उमेदवार लागले कामाला

नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले
ahilyanagar news
नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले Pudhari News Network
Published on
Updated on

जामखेड नगरपरिषद

गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुधवारी (दि. 8) प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी अजय साळवे उपस्थित होते. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला पडल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले असल्याचे दिसत आहे. आता नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने चित्र स्पष्ट झाले आहे.

जामखेड पंचायत समिती कार्यालयामध्ये बुधवारी सकाळी 11 वा. जामखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी श्रेयश व्यवहारे, साई टेकाळे व मोक्षदा मयूर पुजारी या तीन विद्यार्थांच्या हाताने प्रभागाची सोडत काढण्यात आली.

या वेळी शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व नागरिक उपस्थित होते. जामखेडमध्ये 12 प्रभाग असून, एका प्रभागात 2 उमेदवार असे 24 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. गुरुवारी (दि. 9) नगरपरिषदचे मुख्याधिकारी अजय साळवे हे आरक्षण राज्य सरकारच्या राजपत्रात जाहीर करण्यात येणार आहे. यावर हरकतींसाठी दि. 9पासून 14पर्यंत मुदत आहे. हरकती असल्यास नगरपरिषद कार्यालयात विहीत नमुन्यात हरकती दाखल करता येणार आहेत.

नेवासा नगरपंचायत

नेवासा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सोडतीनंतर 17 प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत बुधवारी (दि. 8) तहसील कार्यालयात काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले गेले. तर काहींनी हे आरक्षण फायद्याचे ठरले आहे. या आरक्षणामुळे नेवाशात इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल तीन वर्षांपासून प्रलंबित होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर निवडणूक आयोगाने या निवडणुका तातडीने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या नगराध्यक्षाच्या सोडतीमध्ये नगराध्यक्षपद सर्वसाधारण पदासाठी निघाल्याने इच्छुकांची संख्या वाढणार आहे.

बुधवारी सकाळी 11 वा. नेवासा तहसील कार्यालयात प्रांताधिकारी सुधीर पाटील, मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षणाच्या चिठ्ठ्या मिताली गौरव चव्हाण, वृंदा अक्षय शिंदे, शुभ्रा सागर गाडे या मुलींच्या हस्ते काढण्यात आल्या. या वेळी नागरिकांसह इच्छुकांची संख्या लक्षणीय होती. जसजसे आरक्षण चिठ्ठ्या निघत होत्या तसतशी उत्सुकता ताणली गेली होती. या आरक्षणामुळे कही खुशी कही गम वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांचा हिरमोड झाला आहे, तर काहींना संधी मिळणार आहे. काहींना सौभाग्यवतींना निवडणुकीत उतरावे लागणार आहे. 17 जागांपैकी 9 जागांवर महिलांना उमेदवारी असणार आहे. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. प्रत्येक मतदाराला दोन मतपत्रिका मिळणार असून, एक नगरसेवकासाठी व दुसरे नगराध्यक्षासाठी असे मतदान होणार आहे. एकूण 17 नगरसेवक व एक नगराध्यक्ष असे 18 लोकप्रतिनिधी नेवासा नगरपंचायतीसाठी निवडले जाणार आहेत

श्रीगोंदा नगरपालिका

नगरपालिकेच्या नगरसेवकपदाच्या 22 जागांसाठी बुधवारी (दि. 8) तहसील कार्यालय येथे सोडत काढण्यात आली. या आरक्षणामुळे कही खुशी कही गम वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांचा हिरमोड झाला आहे, तर काहींना संधी मिळणार आहे.

प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत जाहीर करण्यात आली. पाच लहान मुलांच्या हस्ते बावीस जागांसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. या वेळी मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत उपस्थित होत्या. प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले अन्‌‍ नगरसेवक पदाचे आरक्षण निघाल्याने नगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.

शेवगाव नगरपालिका

शेवगाव नगरपालिकेच्या नगरसेवकपदाच्या 24 जागांसाठी साठी आरक्षण सोडत बुधवारी (दि. 8) तहसील कार्यालयात जाहीर झाली. काही जागा आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांना आता सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरण्याचा इरादा हाती घेतला आहे.

तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी विजया घाडगे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षप्रमुखांच्या उपस्थित आरक्षण सोडत काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून 24 जागांची सोडत काढण्यात आली.

काही विद्यमान नगरसेवकांचा प्रभाग राखीव झाल्याने सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरण्याचा इरादा आखण्यात येत आहे. आरक्षणात 24 नगरसेवकांपैकी 12 महिलांना संधी मिळणार आहे.

बऱ्याच दिवसांपासून निवडणुका रखडल्याने यंदा इच्छुकांची मोठी संख्या राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपक्ष संख्या वाढण्याची शक्यता दिसत आहे. बहुरंगी लढती होण्याची शक्यता दिसत आहे.

भाजपच्या आ. मोनिका राजळे, राष्ट्रवादीचे माजी आ. नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, खा. निलेश लंके यांच्याकडून विशेष लक्ष घालून नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना हाती घेतली जाणार आहे.

पाथर्डी नगरपालिका

आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारी (दि. 8) पाथर्डी नगरपालिकेत प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामुळे विद्यमान नगरसेवकांना पुन्हा सभागृहात प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता आहे, तर नव्या उमेदवारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

यंदा पालिकेच्या सभागृहातील नगरसेवकांची संख्या 17 वरून 20वर गेली असून, दहा प्रभागांमधून प्रत्येकी दोन असे एकूण 20 नगरसेवक निवडले जाणार आहेत. यापैकी 10 जागा महिलांसाठी राखीव असतील.

पालिका कार्यालयात बुधवारी सकाळी प्रांताधिकारी प्रसाद मते, मुख्याधिकारी संतोष लांडगे, निवडणूकप्रमुख विशाल डहाळे, सहायक नगररचनाकार नरेंद्र तेलोरे, विजय जाधव, पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या उपस्थितीत दोन लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या वेळी माजी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, चंद्रकांत भापकर, डॉ. सुहास उरणकर, हुमायून आतार, अण्णा हरेर, भैय्या इजारे, रोहित पुंड, आकाश काळोखे, बबलू वावरे, राहुल ढाकणे, गणेश आंधळे, किरण दहिफळे, रावसाहेब कंठाळे, सुरेश हुलजुते, संदीप बोरुडे, राजेंद्र बोरुडे आदी उपस्थित होते.

राहाता नगरपरिषद

राहाता नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी एकूण 10 प्रभागांचे 20 नगरसेवक पदासाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत (बुधवारी दि. 8) रोजी प्रांताधिकारी माणिक आहेर व मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेच्या कार्यालयात पार पडली. सोडतीनुसार 10 महिला तर, 10 पुरुषांना निवडणुकीद्वारे नगरसेवकपदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे. पुरुष- महिलांना समान जागा मिळाल्यामुळे राहाता पालिकेत पुरुष- महिलांचे राजकीय बलाबल समान राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news