Theft Pudhari
अहिल्यानगर

Madhi Mayamba Yatra Gold Jewellery Theft: मढी-मायंबा यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; चार घटनांत साडेसहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास

आषाढी अमावास्या यात्रेतील गर्दीचा फायदा; दर्शन रांगा, मंदिर परिसर आणि प्रवासादरम्यान १.१० लाखांच्या दागिन्यांची चोरी

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी: आषाढी अमावास्या यात्रेनिमित्त मंगळवारी (दि. १४) श्रीक्षेत्र मढी-मायंबा येथे राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसर, दर्शन रांगा, तसेच खासगी वाहनांमध्येही मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चारही वेगवेगळ्या घटनांमध्ये सोन्याचे दागिने लंपास केल्याची बाब समोर आली आहे.

या चारही प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात दोन दिवसांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख १० हजार रुपये आहे. साडेसहा तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. पहिल्या घटनेत पुण्यातील भोसरी येथील संगीता अंकुश काळे (वय ५२) या मंगळवारी (दि. १४) अमावास्या यात्रेनिमित्त मढी-मायंबा येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनाच्या रांगेत उभ्या असताना त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण चोरट्याने चोरून नेले.

या प्रकरणी त्यांनी गुरुवारी (दि. १६) पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.दुसऱ्या घटनेत पुण्यातील चंदननगर येथील मंगल संपत शेळके (वय ५५) या मुलासह अमावास्या यात्रेसाठी मढी येथे आल्या होत्या. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पायथ्याशी असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण हिसका देऊन तोडून नेले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या पुण्याला परतल्यानंतर बुधवारी (दि. १५) पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तिसऱ्या घटनेत पाथर्डी येथील मधुबाला अजीत मेहेर (वय ५६) या मंगळवारी (दि. १४) अहिल्यानगरहून पाथर्डीकडे एसटी बसने प्रवास करत होत्या.

करंजी येथे बस नाश्त्यासाठी थांबल्यानंतर त्यांच्या बॅगेची चेन उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरी आल्यानंतर बॅग तपासली असता, त्यामध्ये ठेवलेले ७० हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरीस गेल्याचे आढळून आले. या प्रकरणी त्यांनी गुरुवारी (दि. १६) पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अमावस्या यात्रेमुळे मढी परिसरात भाविकांची तसेच खाजगी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दर्शन रांगा, मंदिर परिसर आणि प्रवासादरम्यान हातचलाखी करून दागिन्यांवर डल्ला मारल्याचा जात आहे.

सलग तीन घटना उघडकीस आल्याने यात्रेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पाथर्डी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. चौथ्या घटनेत बीड जिल्ह्यातील माळापूर येथील रवींद्र रामभाऊ नेगुळे (वय ३५) हे पत्नी शिवकन्या यांच्यासह मढी येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन करून मंदिराबाहेर आल्यानंतर पत्नीच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. शोध घेऊनही दागिना न मिळाल्याने त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT