

नगर: जिल्हा बँकेच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली. आता निवडणूक कार्यक्रमाचे वेध लागले आहेत. या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पहिल्यांदाच लक्ष घातले आहे. त्यासाठी त्यांनी राजकीय जुळवाजुळवही सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे, राजेंद्र फाळके यांची भेट घेतली. त्यानंतर आता प्रसाद तनपुरे, बाजीराव खेमनर यांच्या निवासस्थानी जाऊन ते भेटी घेणार आहेत. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठीतून कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगरच्या राजकारणावर पकड ठेवण्यासाठी जिल्हा बँकेची सत्ता महत्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्व. शिवाजीराव कर्डिले यांना अध्यक्ष करून बँकेत पहिल्यांदा भाजपाचे कमळ फुलवल्याचे दिसले. विखेंची जिल्ह्यात मोठी ताकद आहेच, त्यात आता आ. शिंदे यांनीही जोर लावल्याने महायुती अर्थात भाजपाला बँक निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे.
जिल्हा बँकेसाठी नुकतीच ठरावाची प्रक्रिया झाली. यात अपेक्षेप्रमाणे सभापती शिंदे यांच्या नावाचेही दोन ठराव कर्जत आणि जामखेड तालुक्यांतून झाले. त्यामुळे बँकेत त्यांनी लक्ष घातल्याचे अधोरेखित झाले आहे. याशिवाय, त्यांनी गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील दिग्गजांच्या भेटीगाठींवर जोर दिला आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके हे त्यांचे राजकीय विरोधक असले तरी आ. शिंदे यांनी गुरुवारी त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीत बँकेच्या नव्या समीकरणांवर चर्चा झाली. याशिवाय, शिंदे यांनी पाथर्डीत आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानी पोहचून ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांची भेट घेतली. या वेळी कौटुंबिक खुशालीसोबतच राजकीय चर्चा झाली. एवढ्यावरच न थांबता आता आ. शिंदे हे पुढील दोन दिवस देखील जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. यामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर यांच्या संगमनेर येथील निवासस्थानीही भेटीसाठी जाणार आहेत. संगमनेरात ते आणखी कुठे ‘सुदर्शन’भेट घेणार का, याकडे जाणकारांचे लक्ष असेल. त्यानंतर शिंदे हे राहुरीत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानीही जाणार आहेत. या भेटीत आमदार प्राजक्त तनपुरे उपस्थित असतील, असेही समजते. त्यामुळे या भेटीतही बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा न झाल्यास नवलच!
कोल्हे, मुरकुटे, कदम यांच्याही भेटी
सभापती शिंदे यांनी यापूर्वीच जिल्ह्यात बांधणी सुरू केल्याचे लपून नाही. आमदार विवेक कोल्हेंच्या सत्काराला उपस्थित दर्शवत बँकेची पायाभरणी केल्याचे बोलले जाते. विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्यासाठी राम शिंदे यांनी प्राजक्त तनपुरे यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिल्याचेही कानावर आले होते. देवळालीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम, सत्यजित कदम, श्रीरामपुरातून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचीही भेट घेतल्याचे पुढे येत आहे. पुढील आठवडाभरात आणखी काही नेत्यांना ते भेटणार असल्याचेही समजते. आ. शिंदे यांच्या या भेटीगाठीतून बँकेची साखरपेरणी केली गेली का, अशीही चर्चा आहे.
यशवंतराव गडाखांना भेटणार!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन गरजचे आहे. त्यासाठी भेटीगाठी घेत आहे, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करत आहे. यापूर्वी चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटेंशीही चर्चा झाली. आप्पासाहेब राजळे यांचे मार्गदर्शन मिळाले. तनपुरेंनाही भेटतो आहे. लवकरच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याही निवासस्थानी जाऊन त्यांचेही आशीर्वाद घेणार आहे, असे सभापती आ.राम शिंदे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
त्या अहवालात फोटो नसल्याचा सल
वास्तविकतः जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी प्रथमच लक्ष घातले आहे. त्यासाठी कारणही तसेच सांगितले जात आहे. सन २०२५ मध्ये बँकेत दिवंगत आमदार कर्डिलेंच्या रूपाने भाजपाची सत्ता होती. आ. शिंदे तेव्हाही विधान परिषदेचे सभापती होते. असे असताना जिल्हा बँकेच्या वार्षिक अहवालात त्यांचा फोटो छापला गेला नव्हता. हा अपमान त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता. जिल्हा बँकेच्या जामखेड शाखेसमोर निदर्शने झाली होती. एवढेच नाही तर स्वतः शिंदे यांनीही बँकेच्या सर्वसाधारण सभेत थेट नाराजी व्यक्त करत ‘आता बँकेत लक्ष घालावे लागेल’ असे सूतोवाच केले होते. कदाचित, तेव्हापासूनच आ. शिंदे यांनी बँकेच्या निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू केली असावी, असे बोलले जाते.