

पारनेर: पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक असणारा युरिया अखेर दैनिक ‘पुढारी’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर उपलब्ध झाला; मात्र नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र पारनेरमध्ये पाहायला मिळाले. फक्त एकाच कृषी सेवा केंद्रावर युरियाचा साठा उपलब्ध झाल्याने शेकडो शेतकऱ्यांना तासन्तास रस्त्यावर उभे राहून युरिया घेण्याची वेळ आली. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘पारनेरात खत-औषधात शेतकऱ्यांची लूट, कृषी विभाग गप्प!" या ‘पुढारी’च्या बातमीचा परिणाम म्हणून तालुक्यात युरिया उपलब्ध झाला आहे. मात्र कृषी विभागाचे नियोजन अजूनही शून्य असल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले.
युरिया फक्त एकाच कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध झाल्याने शेकडो शेतकऱ्यांना रस्त्यावर तासन्तास रांगेत उभे राहावे लागले. पेरणीच्या हंगामात युरियासाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रात हेलपाटे मारावे लागत आहेत. पेरणी केलेल्या मका, बाजरी, मूग, वाटाणा आदी पिकांसाठी युरियाची गरज आहे.
युरिया उपलब्ध झाल्याची माहिती समजताच शेतकरी हातातील कामे सोडून 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास करून येथे आले होते. मात्र त्यांना तासान्तास ताटकळत रांगेत उभे राहावे लागले. यातील काही शेतकऱ्यांना युरिया मिळाला नाही. कृषी विभागाचे अजूनही कानावर हात असून खत-औषधातील अनियमितता आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी आधीच केली आहे.
प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर युरियाचा साठा समप्रमाणात उपलब्ध करून द्यावा, ऑनलाईन नोंदणी किंवा टोकन पद्धतीने वाटप करून शेतकऱ्यांची गर्दी आणि गैरसोय टाळावी, तसेच वाटपात पारदर्शकता ठेवावी, अशा मागण्याही शेतकरी करीत आहेत.