राहाता : कोंबड्या ठेवून पाहिल्या, शेळीचेही आमिष दाखवले, तरीही बिबट्या पिंजऱ्यात अडकत नसल्याचे पाहून, ग्रामस्थांनी प्रयोग म्हणून एक कुत्र्याचे पिल्लू पिंजऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी ठेवले. अखेर, बिबट्याने आपल्या आवडीची शिकार पाहून कुत्र्याची मेजवानी घेण्यासाठी पिंजऱ्यात प्रवेश केला आणि 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तो पिंजऱ्यात जेरबंद झाला. दरम्यान, एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला असला तरी आणखी एक ते दोन बिबटे परिसरात असल्याच्या चर्चेने भिती कायम दिसली.
गेल्या काही महिन्यांपासुन लोणी परिसरात दोन बिबट्यांचा मुक्त संचार वाढला होता. पाळीव कुत्र्यांचा, शेळ्या, कालवडी जनावरांचा बिबट्यांनी फडशा पाडला होता. त्यामुळे अक्षय वाबळे व राम कोते यांनी वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने तत्काळ पिंजरा उपलब्ध करून दिला.
सुरुवातील भक्ष म्हणुन कोंबड्या ठेवल्या. पण कोंबड्यांना बिबट्या आकर्षित झाला नाही. त्यांनतर त्यांनी काही दिवस भक्ष म्हणुन शेळी ठेवून पाहिली पण तरीही बिबट्या काही जेरबंद होत नव्हता. म्हणून काल संध्याकाळी कुत्र्याचे पिल्लु भक्षाच्या पिंजऱ्यात ठेवले आणि पहाटे 5 वाजे दरम्यान दरवाजाचा आवाज आल्यावर ग्रामसेवक सुनिल वाबळे व अभिनय कोते, कामगार शिंदे, बर्डे यांनी बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री केली. काहीवेळातच प्राणीमित्र विकास म्हस्के यांच्यासह वनरक्षक संजय साखरे घटनास्थळी पोहोचले. उपवनसंरक्षक अधिकारी धर्मवीर शालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, संगमनेरचे सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश रोडे यांना माहिती देण्यात आली. तोपर्यंत वनविभागाच्या वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय साखरे व विकास म्हस्के, विलास डगळे, मंजाबापू खेमनर यांनी पंचनामा करून पिंजरा हलविण्याची कार्यवाही केली.
दरम्यान बघ्यांची गर्दी पांगवण्यासाठी मंगेश दिघे, सी एम विखे, अभिनय कोते, नाना धावणे, संदीप भोकनळ, राम कोते , अक्षय वाबळे, सुभाष दिघे,नकुल कटारे,श्रीपाद दिघे, रमेश विखे, गोरक्ष विखे, संजय दिघे, शैलेश विखे, सुरज कुरकुटे, राहुल दिवटे, डॉ. मुसळे यांनी मदत केली. बिबट्याची वैद्यकीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महेश भालेराव यांनी केली. त्यांच्या निरीक्षणात जेरबंद बिबट्यास शासकीय रोपवाटिकेत ठेवले.
एक बिबट्या जेरबंद झाल्याने भीतीचे वातावरण कमी झाले असले, तरी अजूनही एक दोन मोठे बिबटे परिसरात मुक्त संचार करत असल्याची चर्चा आहे. हा बिबट्या जेरबंद झाल्यानंतर दुसरा बिबट्या पिंजऱ्याभोवती चक्कर मारताना कोते व वाबळे यांनी पाहिला. तेव्हा वनविभागाने या ठिकाणी परत पिंजरा लावावा, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
श्रीरामपूर ः तालुक्यातील पढ़ेगाव, मालुंजा, मातापूर परिसरात बिबट्यांचा वावर बाढला आहे. दिवसाढवळ्या अनेकांना बिबट्याचे दर्शन घडत असल्याचे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसांत कुठेना कुठेतरी कुत्री, शेळी, बोकड, वासरे, कालवडी फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरात सहा बिबटे असण्याची शक्यता असून या बिबट्यांना जेरबंद करण्यासांठी वनविभागाने त्वरित पिंजरे लावावेत, अशी मागणी शेतकऱ्यांसह सरपंच किशोर बनकर यांनी केली आहे.
श्रीरामपूर ः तालुक्यातील उक्कलगाव परिसरात बिरोबा वस्ती येथे काल सायंकाळी भास्कर दिनकर जगधने यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी कोपरगावचे वनपाल पी. डी. सानप व वनरक्षक ए. ए. बडे यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. तो अंदाजे तीन महिने वयाचा बिबट्या असल्याचे अधिकाऱ्यानी सागितले. पंचनाम्यानंतर घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीरामपूर ः तालुक्यातील खंडाळा येथे राधाकिसन ढोकचौळे यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी करताना मजुरांना बिबट्याचे तीन नवजात बछडे सापडले. त्यामुळे आसपास बिबट्याची मादी असेल, या धास्तीने मजुरांनी ऊसतोडणी बंद केली. शेतकऱ्यांनी बछड्यांचे फोटो वन अधिकाऱ्यांना पाठविले असता, ते बिबट्याचे बछडे नव्हे, तर रानमांजराची पिले असल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते. या पिलांना तेथेच सुरक्षित ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला. परंतु डोळेही न उघडलेली एवढी मोठी पिले रानमांजराची असतात का, या शंकेने संमिश्र चर्चा सुरू होती.