

नगर : महावितरणच्या टीओडी स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना लागू झालेल्या नवीन दरानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिवसा वापरलेल्या वीज वापरावर वीजबिलात टीओडी सवलत लागू आहे. या मीटरला अहिल्यानगर मंडळात उत्तम प्रतिसाद मिळत असून, 1 लाख 12 हजार 705 स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना ऑक्टोबर या एका महिन्यात 19 लाख 17 हजार रुपयांची सवलत वीजबिलात मिळाली आहे.
महावितरणकडून राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (ढळाश ेष ऊरू) मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा 1 जुलैपासून सुरु झाला असून, महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.
स्मार्ट टीओडी मीटरचे मासिक रीडिंग स्वयंचलित होणार आहे. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येणार आहेत. तसेच घरात किती वीज वापरली याची सर्व माहिती संबंधित ग्राहकाच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध राहणार आहे. ज्यांच्याकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्यातून वापरलेल्या व शिल्लक राहिलेल्या विजेचा लेखाजोगा ठेवणे हे या स्मार्ट टीओडी मीटरचे प्रमुख फायदे आहेत.
महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नाही तर पोस्टपेड आहे. म्हणजे आधी वीज वापरा मग मासिक बिल भरा अशी सध्याची मासिक बिलिंग पद्धत पुढेही राहणार आहे. घरगुती ग्राहकांकडे टीओडी मीटर असल्याशिवाय त्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.