खेड-कर्जत: ‘कुकडी’च्या आवर्तनातून तालुक्यातील पाझर तलाव, बंधारे आणि नद्यांमध्ये पाणी सोडावे, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २७) करपडी फाटा येथे माजी सरपंच युवराज हाके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. कुकडी विभागाचे उपअभियंता विभुते आणि शाखा अभियंता लष्करे यांनी पाणी सोडण्याचे व आगामी काळात योग्य नियोजन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
‘कुकडी’चे आवर्तन चिलवडी मुख्य चारीला सोडल्याने काही भागांनाच त्याचा लाभ मिळत आहे. बेलोरा नदी आणि मकाई चारीला पाणी सोडल्यास चिलवडी, होलेवाडी, रोकाळेवाडी (काळेवाडी), परीटवाडी, करपडी, मानेवाडी, खैदानवाडी आणि आखोणी या गावांचा पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी मागणी करण्यात आली.
देशमुखवाडी येथील तलावात पाणी सोडल्यास देशमुखवाडी, कानगुडवाडी आणि सोनाळवाडी परिसराला लाभ होईल. चारी क्रमांक ७ व ८ मधूनही पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच राशीन परिसरातील गवळरान, सायकरवस्ती आणि नांदणी नदीत आवर्तन सोडल्यास येसवडी, आखोणी, वायसेवाडी, करमनवाडी आदी गावांचा पाणीप्रश्न सुटू शकतो. करपडी तलावातही पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.
या मागण्यांसाठी युवराज हाके यांनी १८ नोव्हेंबर रोजीच कुकडी प्रशासनासह संबंधित विभागांना निवेदन दिले होते. मात्र, त्याची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. अनेक वर्षांपासून मागणी करूनही पाणीवाटपाचे योग्य नियोजन होत नसल्याची नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली. आंदोलनस्थळी उपअभियंता विभुते आणि शाखा अभियंता लष्करे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. संबंधित भागात पाणी सोडण्याचे आणि आगामी काळात योग्य नियोजन करून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
या आंदोलनात माऊली सायकर, रवींद्र पवार, लक्ष्मण भंडारी, स्वप्नील देशमुख, विठ्ठल काळे, राम देशमुख, अक्षय भवर, रेवन काळे, संतोष पवार, हनुमंत सूळ, ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनावेळी सहायक पोलिस निरीक्षक गणेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक, पोलिस कॉन्स्टेबल रायकर, मुरकुटे आणि काळे यांनी बंदोबस्त ठेवला.