Sant Bhagwanbaba Multistate Credit Society: भगवानबाबा मल्टिस्टेटवर अवसायक नेमा; खातेधारकांची मागणी

चार पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचा अर्जात उल्लेख
Sant Bhagwanbaba Multistate Credit Society
Sant Bhagwanbaba Multistate Credit SocietyPudhari
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेचे कामकाज अनेक दिवसांपासून बंद असल्याने हजारो सभासद, बचत खातेधारक आणि मुदत ठेव ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत.

या ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळावी, तसेच संस्थेच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे, यासाठी संस्थेवर तातडीने अधिकृत अवसायक (संस्था विसर्जन अधिकारी) नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Sant Bhagwanbaba Multistate Credit Society
NMMS App Problems: आदिवासी भागात रोजगार हमी योजनेला तांत्रिक अडचणींचा विळखा

यासंदर्भात बाधित खातेदारांतर्फे अरविंद नागरे यांनी केंद्रीय सहकार निबंधकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की,श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेची नोंदणी सहकार मंत्रालयांतर्गत झाली असून, संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय बोधेगाव (ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) येथे आहे.

मात्र, संस्थेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाल्याने ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळण्यात अडचणी येत आहेत. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर आणि अहिल्यानगर येथील पोलिस ठाण्यांत चार गुन्हे दाखल असून, संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करून मालमत्ता, बँक खाती, स्थावर-जंगम संपत्ती आणि आर्थिक अभिलेख अधिकृत अवसायकाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Sant Bhagwanbaba Multistate Credit Society
Jayakwadi Dam water protest: पाण्यासाठी ४६ गावांचा एल्गार; बैलगाड्यांसह गावकऱ्यांचा खरवंडीत महामार्गावर चक्काजाम

संस्थेकडून कर्ज घेतलेल्या थकबाकीदारांकडून कायदेशीर मार्गाने कर्जवसुली करावी, संस्थेच्या मालमत्तेची विल्हेवाट किंवा गैरवापर होऊ नये, तसेच बाधित सभासद व ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, डॉ. अरविंद नागरे, बंडू तुपे, प्रतीक बडे आदींच्या विशेष शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय सहकार विभागाच्या कार्यालयात भेट देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यांनी अवसायक नियुक्तीबाबत लवकर कार्यवाही करण्याचे, तसेच आर्थिक गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक यांच्याशी पत्रव्यवहार करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.

ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार?

संस्थेकडे कष्टाची कमाई जमा केलेल्या खातेदारांना अद्याप पैसे मिळालेले नसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून अधिकृत अवसायकाची नियुक्ती करावी आणि ठेवीदारांची रक्कम परत मिळण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी बाधित खातेदारांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.