Electricity  Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon Electricity Development: कोपरगाव ग्रामीण भागातील वीजपुरवठ्यासाठी 97 लाख मंजूर; 12 गावांत नवे रोहित्र

आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्याला यश, शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

कोळपेवाडी: कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत व अधिक सक्षमपणे करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम योजने अंतर्गत मतदार संघातील 12 गावांमधील नवीन 15 विद्युत रोहित्रांसाठी तब्बल 97 लाख रुपयांच्या निधीस महायुती शासनाने मंजुरी दिली आहे.

कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरीकांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या विजेच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी आजवर केलेल्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात वीज रोहीत्रांचा प्रश्न सुटला आहे. ज्या शेतकऱ्यांना वीज रोहित्राची आवश्यकता होती, त्यांना तातडीने वीज रोहित्र उपलब्ध करून दिले. तसेच ज्या ठिकाणी वीज रोहित्राची क्षमता वाढविणे गरजेचे आहे, त्या ठिकाणी अधिक क्षमतेचे वीज रोहित्र बसवून शेतकऱ्यांची वीज रोहीत्रांबाबत होणारी अडचण आमदार काळे यांनी दूर केल्यामुळे कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागाचा विजेचा प्रश्न बहुतांशी प्रमाणात निकाली निघाला आहे.

दरम्यान, तालुक्यातील 12 गावातील नवीन 15 विद्युत रोहीत्रांसाठी 97 लाख रुपये निधी मंजूर करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघातील अंजनापूर, घारी, जवळके, धोंडेवाडी, पोहेगाव बु, बहादरपूर, मढी खु., रांजणगाव देशमुख, लौकी या गावांकरिता प्रत्येकी 1 तर चांदेकसारे, सोनेवाडी आणि डाऊच खुर्द गावांसाठी प्रत्येकी 2 अशी एकूण 17 नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कमी दाबाने मिळणारी विजेची समस्या कायमची संपुष्टात येवून वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच शेती पंपांना सुरळीत वीज पुरवठा होवून शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होणार असून वीज उपकरणांचे नुकसान टळणार आहे.

नवीन रोहीत्रामुळे घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून नवीन जोडण्या देणे शक्य होणार आहे. त्यामुळे महावितरणवरील ताण देखील कमी होवून ग्रामीण विकासाला अधिकची गती मिळण्यास मदत होणार आहे. त्याबद्दल कोपरगाव मतदार संघातील संबंधित गावातील नागरीकांनी आ. काळे यांचे आभार मानले आहे.

‌‘पोहेगाव‌’ लवकरच शहा सबस्टेशनला जोडणार

132 के.व्ही.ए.च्या शहा सबस्टेशनला पोहेगाव सबस्टेशन जोडण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे पोहेगाव सबस्टेशन लवकरच शहा सबस्टेशनला जोडले जावून या सर्व रोहीत्रांना अधिकचा वीज पुरवठा प्राप्त होणार आहे. त्याचा फायदा ग्राहकांना अखंडीतपणे वीज पुरवठा होण्यास मदत होणार असून त्यामुळे वीज पुरवठ्याच्या अडचणी कायमच्या संपुष्टात येतील, असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT