Kopargaon Election Dispute Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon Election Dispute: पराभव दिसल्यानेच विरोधकांची न्यायालयात धाव; आ. काळेंचा पलटवार

कोल्हे गटाची याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळली; विकासाच्या मुद्द्यावर लढण्याचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

कोळपेवाडी : विरोधकांकडे सर्व प्रकारची सत्ता असताना कोपरगाव शहराचा विकास करता आला नाही. याउलट होणाऱ्या विकासकामात कसा खोडा घालता येईल, यासाठी जास्त वेळ दिला. त्यामुळे दोन तारखेला आपला निभाव लागणार नाही, याची खात्री पटल्यामुळे ते मुद्दाम न्यायालयात गेले. निवडणूक जिंकण्यासाठी न्यायालयात जाण्याऐवजी विरोधकांनी जनतेच्या न्यायालयात जायला हवे होते. किमान जनतेने कुठे तरी त्यांचा विचार केला असता, असा उपरोधिक टोला आ.आशुतोष काळे यांनी कोल्हे गटाला दिला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत छाननीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा आक्षेप न घेणाऱ्या कोल्हे गटाने राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवकांच्या उमेदवारीला कोणत्याही प्रकारचा कायदेशीर आधार नसताना अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर शुक्रवार (दि.21) रोजी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर दि.22 व 23 रोजी सुट्टी असताना देखील जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरु ठेवून दोन्ही गटाच्या वतीने जोरदार बाजू मांडण्यात आली. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत त्याबाबत सोमवार (दि.24) रोजी निकाल देवून कोल्हे गटाने दाखल केलेली याचिका फेटाळल्या आहेत. त्याबद्ल आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांच्या समवेत पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष सुनील गंगुले, ॲड.विद्यासागर शिंदे, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, विरेन बोरावके, फकीरमामू कुरेशी, प्रकाश दुशिंग, शिवाजी ठाकरे आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे म्हणाले की, विरोधी पक्षाच्या याचिकेला आम्ही फार महत्व दिले नाही. कोणताही प्रश्न न्यायालयात न्यायचा, भिजत ठेवायचा आणि विकास कामांना विरोध करायचा व खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी त्यांची सवय आहे. त्यांनी त्यांच्या उमेदवारांची दिशाभूल करून त्यांना सांगितले कि, काका कोयटे यांचा उमेदवारी अर्ज रद्द होणार आहे आणि तुम्ही बिनविरोध निवडून येणार आहे. परंतु हि याचिका तथ्यहीन असल्याचे सिद्द झाले आहे. त्यामुळे त्यांच्याच काही उमेदवारांनी मला भेटून आमच्या नेत्याने न्यायालयात जावून त्यांचे आणि आमचे नुकसान केले असल्याचे खाजगीत सांगितले आहे.

नेमकी याचिका काय होती?

यावेळी ॲड.विद्यासागर शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या अर्जात तारखांमध्ये बदल आहे आणि शपथ पत्रावर स्वाक्षरी नाही. या विषयी आक्षेप असल्याची याचिका जिल्हासत्र न्यायालयात दाखल करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी फॉर्म भरायला सांगितले होते. परंतु निवडणूक आयोगाचे पोर्टल डाऊन झाल्याने एक फॉर्म भरायला तीन चार तासांचा वेळ लागत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांना लेखी स्वरुपात सूचना देवून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सांगितले होते. एखाद्या उमेदवाराने रात्री 11 वा. अर्ज भरायला सुरुवात केली आणि त्याचा अर्ज भरताना रात्रीचे 12 वाजून गेले तर दुसरा दिवस सुरु होतो.

यावेळी तारीख आणि वेळ बदलते. या बदलणाऱ्या तारखेवर त्यांचा आक्षेप होता. परंतु निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी भारती सागरे यांनी न्यायालयाला या बाबतचा सविस्तर खुलासा दिला असून कोपरगाव न्यायालयाचे न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. डी.डी.आलमाले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका ग्राह्य धरत विरोधकांचे अपील फेटाळले असल्याचे सांगितले.

जनतेच्या न्यायालयातही आम्हालाच न्याय ः कोयटे

विरोधकांनी कोणताही कायदेशीर आधार नसताना हि याचिका पराभव दिसू लागल्याने दाखल केली. त्यांची याचिका चुकीची होती. न्यायालय ती फेटाळून लावणार याचा आम्हाला विश्वास होता. त्यामुळे आमचे कोणीही उमेदवार न्यायालयात उपस्थित नव्हते. आम्ही आरोपावर किंवा विरोधावर नाही तर विकासावर बोलतो. त्यामुळे हा सत्याचा विजय झालेला आहे. न्यायालयाने देखील आम्हाला न्याय दिला असून जनतेच्या न्यायालयात देखील आम्हाला न्याय मिळणार याचा विश्वास आहे. आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावामध्ये विकासाचे मोठे काम केले म्हणून आम्हाला प्रत्येक प्रभागात भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT