Kopargaon Crop Damage Panchnama Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon Drought: कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त; नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू

आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश; दुष्काळ ट्रिगर-१ लागू, बांधावर जाऊन संयुक्त पंचनाम्यांना सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

कोळपेवाडी: कोपरगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची गंभीर दखल घेत आ. आशुतोष काळे यांनी शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. संपूर्ण कोपरगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ ट्रिगर-१ लागू झाल्यानंतर नुकसानग्रस्त खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

आ. काळे यांनी सोमवारी (दि.२८) महसूल, कृषी तसेच पंचायत समिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पिकांचे पंचनामे तातडीने सुरू करून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची तत्काळ दखल घेत काल बुधवार (दि.३०) पासून महसूल, कृषी व पंचायत समिती कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे संयुक्त पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने कोपरगाव मतदारसंघातील खरीप पिकांची अवस्था गंभीर बनली होती. सोयाबीन, बाजरी, मका पिकासह विविध पिकांवर पावसाअभावी मोठा परिणाम झाला असून उत्पादनात कमालीची घट होणार आहे. त्याचबरोबर पशुधनासाठी चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पिके उभी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींचा सामना करत मोठा खर्च केला होता. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामाची तयारी केली; मात्र पावसाने पुन्हा एकदा ओढ दिल्याने त्यांच्या मेहनतीवर संकट आले.

या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीची वस्तुस्थिती आ. काळे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून देत संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने संपूर्ण कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करून दुष्काळ ट्रिगर-१ लागू केला आहे.

त्यानंतर आता नुकसानग्रस्त पिकांचे संयुक्त पंचनामे सुरू झाल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, अशा सूचना आ. काळे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT