Nagar Bank Gold Loan Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Interest Rates: पतसंस्थांसाठी दिलासादायक निर्णय; जिल्हा बँकेकडून ठेवींवर व्याजवाढ, कर्जावरील टक्का कपात

7.40 टक्के आकर्षक व्याजदर जाहीर; सहकारी चळवळीला बळ देणारा ऐतिहासिक निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव : पतसंस्थांच्या ठेविंवरील व्याजदरात वाढ समाधानकारक वाढ करीत, ठेविपोटी कर्जाचा टक्काही कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा, काका कोयटे यांनी दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांसाठी अर्धा टक्का ज्यादा म्हणजेच वर्षासाठी 7.40 टक्के आकर्षक व्याजदर घोषित केला आहे. या निर्णयाचे स्वागत करीत, जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी ठेवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतचं गुंतवाव्या, असे आवाहन काका कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे व नाशिक जिल्हा विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी केले आहे.

काका कोयटे म्हणाले की, अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांची ज्यादा व्याजदराची मागणी होती. जिल्ह्याचे सुपूत्र चंद्रशेखर घुले यांनी, जिल्हा बँक अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच, सहकारी पतसंस्थांशी चर्चा करून, व्याजदर वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेतला. यामुळे जिल्ह्यातील सहकारी चळवळीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने नुकताच 11 हजार कोटी रुपये ठेविचा टप्पा गाठला आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ठेवी 12 हजार कोटी रुपयांपुढे जातील. मुदत ठेवींवरील कर्जाचे व्याजदर यापूर्वी 2 टक्के होता. तो आता केवळ अर्धा टक्का करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे.

सहकारी पतसंस्थांसाठी बँकेच्या बँकिंग विभागात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यातून पतसंस्थांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यात येणार आहे. ‌‘सहकार अंतर्गत सहकार‌’ या तत्वानुसार सर्व सहकारी पतसंस्थांनी स्वतःच्या ठेवी जिल्हा बँकेतच ठेवाव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे उपस्थित होते. सहकारी पतसंस्थांची बाजू जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मधुकरराव नवले, कडूभाऊ काळे, वासुदेव काळे, बँकेचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. मंत्री, अकोले तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भाऊ नवले व नितीन चासकर यांनी भक्कम मांडली.

राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांमध्ये ठेवी ठेवल्यास मिळणाऱ्या व्याजावर आयकर कपात होते, मात्र जिल्हा बँकेतील ठेवींवरील व्याजावर आयकर भरावा लागत नाही. यामुळे पतसंस्थांना अधिक आर्थिक लाभ होणार आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

‌‘जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहात बँक व सहकारी पतसंस्था समन्वय बैठक पार पडली. यावेळी जिल्हा बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने नवीन पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांसाठी क्यू.आर. कोड सुविधा जिल्हा बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल.
चंद्रशेखर घुले, जिल्हा बँकेचे चेअरमन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT