

नगर : “पालकमंत्री ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या सुरुवातीपासून अत्यंत सावधपणे पाऊले टाकत शहराची जबाबदारी मा. खा. डॉ. सुजय दादा विखे पा. व आमदार संग्राम जगताप या युवा नेतृत्वाकडे सोपविली आणि आपल्या चाळीस वर्षांच्या राजकीय अनुभवाचे कसब वापरत अहिल्यानगर शहरातून तुतारी हद्दपार केली,“ अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे निवडणूक जिल्हा समन्वयक श्री. विनायकराव देशमुख यांनी व्यक्त केली.
“ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर शहराच्या राजकारणात प्रथमच लक्ष घातले. निवडणुकीचे उमेदवार निवडण्याची प्रक्रिया असो किंवा युतीतील जागा वाटप असो याबाबत चर्चेचा फारसा घोळ न घालता निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य डॉ.सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नव्या पिढीला दिले . हे करत असताना पक्षातील नव्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी विशेष प्रयत्न केले . निवडणुकीच्या काळात जवळपास आठवडाभर ना. विखे यांनी नगर शहरात तळ ठोकला होता. या काळात त्यांनी लहान मोठ्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. शहरातील भारतीय जनता पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या आणि उमेदवारी न मिळालेल्या नाराज पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेण्याच्या प्रक्रियेला गती आली. आणि भारतीय जनता पक्षातील नवे जुने सर्व कार्यकर्ते एक दिलाने कामाला लागल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले.
एका बाजूला डॉ. सुजय विखे पा.व आ. संग्राम जगताप निवडणुकीच्या रणांगणावर निवडणुकीतील सर्व तंत्रे वापरत भक्कमपणे किल्ला लढवत होते तर दुसरीकडे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडद्याआड राहून भाजप-राष्ट्रवादी युतीच्या मोठ्या विजयासाठी मशागत करुन पायाभरणी केली. त्यामुळेच या युतीला नेत्रदीपक विजय संपादन करता आला.“ असे श्री. देशमुख म्हणाले.
“निवडणुकीच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची अहिल्या नगर येथील जाहीर सभा व त्या सभेतील महिलांची मोठी उपस्थिती निर्णायक ठरली. विरोधकांकडून (प्रामुख्याने महाविकास आघाडी कडून) विखे पितापुत्रांना भाषणातून आव्हान देण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. मात्र महानगरपालिकेचे निकाल पाहता हे आव्हान किती बालिश होते, हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत विखे पिता-पुत्रांच्या डावपेचांसमोर विरोधक अक्षरश: उध्वस्त झाले असून पालकमंत्र्यांना वारंवार दंड ठोकून आव्हान देणाऱ्या तुतारीला या निवडणुकीत भोपळा देखील फोडता आला नाही. या निवडणुकीच्या निकालावरून अहिल्यानगर शहरातील सुज्ञ मतदारांनी तुतारीला पूर्णपणे नाकारले असल्याचे सिद्ध झाले आहे. या जनभावनांची दखल घेऊन आतातरी ही मंडळी आपल्या भाषणबाजीने पोकळ आव्हाने देऊन स्वतः:चे हसे करून घेणार नाहीत,“अशी अपेक्षा श्री. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.