

पाथर्डी : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिरात महिलांना चहा, नाश्ता व जेवण न देता उपाशी ठेवण्यात आल्याच्या गंभीर प्रकाराची पंचायत समितीने दखल घेतली असून, या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता पालवे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार चौकशीचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रय मगरे यांना देण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत शहरातील एका मंगल कार्यालयात पंचायत समितीतर्फे जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सरपंच, पाणीपुरवठा सचिव, स्वच्छ जलसुरक्षा कर्मचारी, आशा वर्कर, मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, तसेच स्वयंसहायता बचत गटांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते.
प्रशिक्षणासाठी उपस्थितांना चहा, नाश्ता, भोजन व उपयुक्त वाचन साहित्य दिले जाईल, असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रशिक्षणार्थींना कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी आशा वर्कर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सोमवार व मंगळवार हे एकादशीचे उपवासाचे दिवस असल्याने अनेक महिला उपाशी होत्या. बुधवारी प्रशिक्षणाच्या दिवशी उपवास सोडण्याची अपेक्षा असताना चहा, नाश्ता व जेवण उपलब्ध न करून दिल्यामुळे महिलांना दिवसभर उपाशीपोटी राहावे लागले.
जर जेवण देणारच नव्हते, तर सर्व सुविधा आहेत असे सांगून आम्हाला बोलावले कशासाठी? असा संतप्त सवाल उपस्थित महिलांनी पंचायत समिती प्रशासनाला केला. केवळ बिले काढण्यासाठी जेवणाचे फोटोसेशन करण्यात आल्याचा आरोपही महिलांनी केला आहे.
जिल्हा परिषद स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागाचे विस्तार अधिकारी यांना लेखी आदेश देऊन सविस्तर चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.
संगीता पालवे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पाथर्डी
या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष मनीषा डांभे यांनी केली होती. वृत्तपत्रांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सोमवारी (दि. 19) प्रशिक्षणार्थी महिला व संबंधित ग्रामसेवकांना पंचायत समिती कार्यालयात चौकशी समितीसमोर हजर राहण्याबाबत लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
संबंधित प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, उपलब्ध छायाचित्रे, प्रशिक्षणार्थी महिला व उपस्थित कर्मचाऱ्यांचे वस्तुनिष्ठ जबाब नोंदवून सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल.
दत्तात्रय मगरे, चौकशी अधिकारी, पंचायत समिती