

नगर : शहरातील न्यू आर्टस, कॉमर्स ण्ड सायन्स महाविद्यालयात 19 व 20 जानेवारी रोजी नगारा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 19 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांच्या हस्ते होईल. त्यानंतर स्व.उस्ताद राशिद खां यांचे पट्टशिष्य सुप्रसिद्ध गायक पं. नागेश आडगावकर यांची शास्त्रीय व सुगम गायनाची मैफल होईल. त्यांना संवादिनीवर स्वानंद कुलकर्णी, तबल्यावर रोहन पंढरपूरकर, व्हायोलिनवर संजुक्ता फुकान, पखवाजवर रोहित खवळे व स्वरसाथ प्रफुल्ल सोनकांबळे हे साथसंगत करणार आहेत.
मंगळवारी (दि. 20) सायंकाळी 6 वाजता सुप्रसिद्ध गायक पं. डॉ. राम देशपांडे व त्यांचे सुपुत्र व पट्टशिष्य, सुप्रसिद्ध गायक गंधार देशपांडे यांचा गुरुशिष्य परंपरा अंतर्गत ‘सहगायन’ हा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. त्यांना संवादिनीवर मकरंद खरवंडीकर, तबल्यावर प्रशांत गाजरे व पखवाजवर सौरभ साठे हे साथसंगत करतील. सर्व कार्यक्रम महाविद्यालयातील राजर्षी शाहू महाराज सभागृह येथे होणार आहेत.
तसेच, दि. 19 जानेवारी रोजी राज्यस्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा महाविद्यालयातील राजर्षी शाहू सभागृह येथे व राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धा (वैयक्तिक) राजमाता जिजाऊ सेमिनार हॉल येथे सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होईल. सायं. 5 वाजता संस्थेच्या पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा पारितोषिक वितरण होईल, असे प्राचार्य डॉ.बाळासाहेब सागडे व प्रा. आदेश चव्हाण यांनी सांगितले.