Posthumous Padma Vibhushan for Ajitdada Pawar Pudhari
अहिल्यानगर

Posthumous Padma Vibhushan for Ajitdada Pawar: स्व. अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ देण्याची मागणी

आ. आशुतोष काळेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; स्व. अजितदादांच्या कार्याला राष्ट्रीय सन्मान मिळावा अशी भावना

पुढारी वृत्तसेवा

कोळपेवाडी: महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्य-कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे लोकनेते राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे महाराष्ट्र राज्याच्या विकासात अलौकिक योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या स्व.अजितदादांच्या अजोड कार्याचा गौरव व्हावा, यासाठी त्यांना मरणोत्तर ‌‘पद्मविभूषण‌’ पुरस्कार देण्यात यावा. याकरीता राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि. 9) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. राज्याच्या राजकारणात चार दशकाहून अधिक काम करणाऱ्या स्व.अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय पटलावरचा एक तेजस्वी, चकाकता तारा कायमचा निखळला आहे.

कृषी, सहकार, शिक्षण, व्यापार, उद्योग अशा अनेक क्षेत्राची सखोल जाण असणाऱ्या स्व.अजीतदादांची जनतेशी आत्मीय नाळ जुळलेली होती. त्यामुळे ते केवळ राजकारणी नव्हते, तर एका संपूर्ण पिढीसाठी ते मार्गदर्शक होते. त्यांच्या शब्दात आत्मविश्वास होता आणि निर्णयांमध्ये लोकहिताची झलक होती. आज ते आपल्यात नसल्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी केवळ एका व्यक्तीची नसून, एका विचारधारेची, एका मूल्यव्यवस्थेची कमतरता आहे जी सहज भरून निघणार नाही.

मात्र अभ्यासू दृष्टिकोन आणि जनतेच्या मनात अजरामर असलेल्या स्व.अजितदादांचे योगदान कदापि विसरता येणार नाही. त्यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होऊन त्यांच्या कार्याला राष्ट्रीय सन्मान मिळावा यासाठी स्व.अजितदादांच्या सन्मानार्थ त्यांना मरणोत्तर ‌‘पद्मविभूषण‌’ पुरस्कार मिळावा यासाठी केद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी विनंती आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

मुख्यमंत्री व्यक्तिश: लक्ष घालणार

स्व.अजितदादांचे सामाजिक व राजकीय योगदान केवळ एका पक्षापुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण राज्यातील जनतेसाठी समर्पक होत. त्यांनी आयुष्यभर समाज, माणूस आणि मूल्यांसाठी सातत्याने कार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी त्यांना मरणोत्तर ‌‘पद्मविभूषण‌’ पुरस्कार देण्याची मागणी भावनिक व नैतिकदृष्ट्‌‍या योग्य असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः व्यक्तिशः लक्ष घालणार आहेत, अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT