Pathardi Armed Robbery Pudhari
अहिल्यानगर

Pathardi Armed Robbery: खरवंडी कासार परिसरात सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

दोन कुटुंबांवर हल्ला करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली; चार-पाच जण जखमी, पोलिसांचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी/खरवंडी कासार: खरवंडी कासार परिसरात बुधवारी (दि. १०) पहाटे सात दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने दोन ठिकाणी धुमाकूळ घातला. दोन कुटुंबांवर हल्ला करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांच्या मारहाणीत चार-पाच जण जखमी झाले. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाबाबत पोलिसांनी सूचना दिल्या.

कीर्तनवाडी येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास शेतकरी रावसाहेब बाजीराव कीर्तने (वय ५३) यांच्या घरी या टोळीने दरोडा टाकला. त्यांचे कुटुंबीय झोपलेले असताना घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून टोळी घरात शिरली. एक जण बाहेर थांबला. दरोडेखोरांनी कपाटांची कुलपे तोडून सोन्याचे दागिने काढले. कीर्तने, त्यांच्या पत्नी अनिता, मुलगा सागर व सून शीतल यांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील व कपाटातील दागिने हिसकावून घेतले.

दरम्यान, सागरने एका खोलीतून नातेवाईकांना फोन करून माहिती दिली. त्यामुळे गावकरी घटनास्थळी येत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी पळ काढला. या दरोड्यात कीर्तने कुटुंबाचे सुमारे ३ लाख ७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास झाली. मारहाणीत गंभीर जखमी झालेले रावसाहेब कीर्तने यांना दवाखान्यात दाखल केले आहे.

याच टोळीने काही वेळानंतर कीर्तनवाडीपासून सुमारे ८०० मीटरवर बाबासाहेब दशरथ बटुळे यांच्या घरावरही दरोडा टाकला. बटुळे व त्यांच्या पत्नीला मारहाण करून १ लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ४० हजार रुपये रोख रक्कम लुटली. तेथेच भागवत बाबुराव बटुळे व शांताराम बप्पा बटुळे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या. पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तपास करत आहे. दरम्यान, खरवंडी कासार परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जबरी चोरी व दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT