Crime News Pudhari
अहिल्यानगर

Karjat Crime: कांदा आणल्याच्या कारणावरून सख्ख्या भावाचा बहिणीवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण

राक्षसवाडी खुर्दमध्ये धक्कादायक घटना; जीव वाचवण्यासाठी बहिणींनी ११२ वर फोन केला, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: शेतातून कांदा आणला म्हणून सख्खा भाऊच वैरी झाला. त्याने कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली. माणुसकीला काळीमा फसणारी दुर्दैवी घटना राक्षसवाडी खुर्द (ता. कर्जत) येथे नुकतीच घडली. अखेर भयभीत झालेल्या बहिणीने डायल ११२ फोन केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिची सुटका केली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे कर्जत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तालुक्यातील राक्षसवाडी खुर्द येथे नुकत्याच घडलेल्या धक्कादायक घटनेची भीषणता एवढी मोठी होती की, भावाकडून आणि त्याच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचण्यासाठी भयभीत झालेल्या बहिणींनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावून घेतले.

पोलिसांचे वाहन वेळेत पोहोचल्यामुळेच या बहिणींची आरोपींच्या तावडीतून सुटका झाली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. परंतु, यानंतर पोलिसांनी दाखवलेला अजब कारभार समोर आला आहे. ज्या आरोपींनी महिलांवर शस्त्र उगारून त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली, त्यांना पोलिसांनी त्याच रात्री तात्काळ अटक करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता, उलट ज्या पीडित महिलांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ११२ पोलिसांची मदत घेतली, त्यांच्यावरच मुख्य आरोपीने पोलिस ठाण्यात येत यांनीच आम्हाला मारहाण करून आमच्या गळ्यातील दागिने चोरले, अशी तक्रार दिली.

वास्तविक पाहता, पोलिसांनी या संदर्भातील सत्य परिस्थिती आणि वैद्यकीय अहवाल तपासून, योग्य माहिती घेऊनच गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु, पोलिसांनी सत्य बाजू न तपासता उलट या अन्यायग्रस्त बहिणींवरच गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. पोलिसांच्या याच भूमिकेमुळे आता जनतेतून संतप्त सवाल विचारला जात आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी रखमाजी विठ्ठल रूपनर, रूपाली रखमाजी रूपनर, रामदास पिंगळे, राहुल पिंगळे, आबा पिंगळे, बिरा बापू कोळपे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी अलका चोरमले या पतीच्या निधनानंतर गेल्या काही वर्षांपासून वडिलांच्या आश्रयाला राहून मजुरी करत आहेत. शेतातून कांदा आणल्याच्या क्षुल्लक कारणावरून सख्खा भाऊ रखमाजी रूपनर याने त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर बहिणीची विचारपूस करण्यासाठी धावून आलेल्या इतर दोन बहिणींवरही आरोपी भावाने, त्याच्या पत्नीने आणि पिंगळे व कोळपे कुटुंबातील नातेवाईकांनी हातात शस्त्रे घेऊन हल्ला केला. यावरून समाजातील माणुसकी आणि संवेदनशीलता पूर्णपणे संपली आहे का? असा संतप्त सवाल या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT