Karjat Farmers Protest Pudhari
अहिल्यानगर

Karjat Farmers Protest: सहा गावांचा वीजपुरवठा विस्कळीत; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

‘सोमवारपर्यंत वीज सुरळीत करा, अन्यथा रास्ता रोको’; पिके, पाणीपुरवठा, दूध व्यवसायासह विद्यार्थ्यांचेही नुकसान

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: कर्जत तालुक्यातील शिंदा, रुईगव्हाण, भोसा, चखालेवाडी, बिटकेवाडी आणि माळेवाडी या सहा गावांमध्ये अनेक दिवसांपासून विस्कळीत झालेल्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी कर्जत येथील महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

‘कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘जय जवान, जय किसान’ अशा जोरदार घोषणांनी महावितरण कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. यावेळी मेजर मधुकर घालमे, विलास घालमे, सुभाष घालमे, कैलास घालमे, अमोल खराडे, डॉ. अशोक खराडे, डॉ. प्रशांत घालमे, अशोक पवार, बंडू घालमे, विण्णूपंत घालमे, राहुल चखाले, प्रदीप खराडे, वसंत घालमे, बाळासाहेब गाढवे, दादासाहेब खराडे, परशुराम ढोले यांच्यासह सहाही गावांतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी कार्यालयाच्याबाहेर ठिय्या आंदोलन देखील शेतकऱ्यांनी केले.

महावितरणच्या कुळधरण उपविभागांतर्गत येणाऱ्या या सहा गावांमध्ये शेतीपंपांसह घरगुती वीजपुरवठाही सातत्याने खंडित होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. सिंगल फेज तसेच थ्री फेज वीजपुरवठा वारंवार बंद राहत असल्याने शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे पिके जळण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने उपलब्ध अल्प पाण्यावर पिके जगविण्याची धडपड सुरू आहे. मात्र, वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही. त्याचबरोबर गावांतील पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम झाला असून नागरिक तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

‘मध्यरात्री वीज येते आणि पुन्हा लगेच बंद होते’, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. रात्रीच्या वेळी वीज नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असून परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांनी सांगितले. खंडित वीजपुरवठ्याचा दूध व्यवसायावरही विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

मोर्चानंतर महावितरण कार्यालयाबाहेर उपस्थित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विविध प्रश्नांचा जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. ‘ग्रामीण भागातील घरात एक दिवस अधिकाऱ्यांनी येऊन राहावे; अंधारात बिबट्या समोर असताना भीती काय असते, हे त्यांना कळेल,’ अशा शब्दांत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी सरपंच, माजी सरपंच तसेच शेतकरी प्रतिनिधींनी गावागावातील वीज समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

शेतकऱ्यांनी महावितरणला स्पष्ट इशारा देत सोमवारपर्यंत सहाही गावांमधील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा; अन्यथा सोमवार (दि. २४) सकाळी ९ वाजता बिटकेवाडी येथे जामखेड-श्रीगोंदा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे जाहीर केले.

मेजर मधुकर घालमे म्हणाले, “स्व. उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या काळात आम्हाला वीजपुरवठ्याचा प्रश्न कधीही जाणवला नाही. त्यांच्या निधनानंतर मात्र आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना विजेसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता हरपल्याने आमचे हाल होत आहेत. आजही या परिस्थितीत आम्हाला अजितदादांची आठवण येते. त्यांनी शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडले नाही.”

दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक, तसेच तहसीलदार यांनाही निवेदन देऊन या गंभीर प्रश्नात तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT