करंजी : अतिवृष्टीबाधित अनेक कुटुंबांना अद्यापही सरकारकडून दमडीचीही मदत मिळाली नसताना जर साहेबांनी विचारलं नुकसानभरपाई मिळाली का? तर हो मना बरं का! असा तलाठी महोदयांनी दिलेला कानमंत्र शेतकऱ्यालाही आचंबित करणारा ठरला.
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी करंजी आणि तिसगाव येथील शेतकऱ्यांच्या भेटीला आले असता त्यांनी अनेक बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. ज्या वेळी करंजी येथे जिल्हाधिकारी येणार असल्याची माहिती समजल्यानंतर एका तलाठ्याने थोरात आडनावाच्या शेतकऱ्याला हा कानमंत्र दिला. या शेतकऱ्यानेही घडलेला संपूर्ण प्रकार गुरुवारी (दि. 15) जाहीरपणे सांगितल्याने उपस्थित गावकरीही आवाक झाले.
करंजी येथे ज्या बाधित कुटुंबांचे खूप मोठे नुकसान झाले त्या बाधित कुटुंबांची यादी मदतीसाठी तालुका प्रशासनाला ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही एकाही बाधित कुटुंबाला सरकारकडून मोठी मदत मिळालेली नाही. असे असतानाही प्रशासनाचा एक कर्मचारीच अजब सल्ला शेतकऱ्याला देत असेल तर प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीचीही आता कीव येण्यासारखे झाले आहे.
आता शेतकऱ्याला भरपाई मिळाली असा सल्ला देणारा तलाठी कोण हेही महत्त्वाचे असून, अशा कर्मचाऱ्यावर चौकशी करून वरिष्ठांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे संतप्त ग्रामस्थांनी म्हटले आहे.
अतिवृष्टीमुळे घर, दुकान, संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे वाहून गेले. अधिकारी- पदाधिकारी येऊन विचारपूस करून गेले. मात्र अद्यापपर्यंत एक पैसाही सरकारकडून मदत मिळालेली नाही याची मोठी खंत वाटते.बाबासाहेब गाडेकर, सुभाष अकोलकर, अश्विन साखरे