

नगर: अहिल्यानगर महापालिकेचा निकाल ऐकण्यासाठी नगरकरांनी एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात एकच गर्दी केली होती. निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी आणि जल्लोषाने परिसर दुमदुमला होता. विजयी मिरवणुका आणि भगव्या गुलालाची उधळण आदींनी एमआयडीसी परिसरातील रस्ते फुलून गेले होते. आनंदोत्सव साजरा करताना बॅरिकेटभोवती झालेली गर्दी हटविण्यासाठी पोलिसांनी उचलेल्या दंडुकांनी कार्यकर्त्यांची एकच पळापळ झाली.
अहिल्यानगरातील एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात शुक्रवारी (दि.16) महापालिकेच्या मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेचे 63 कारभारी कोण होणार याची उत्सुकता ताणली गेल्यामुळे निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच नागरिक आणि कार्यकर्त्यांनी एमआयडीसीकडे धाव घेतली. मतमोजणी ठिकाणापासून दोन हजार फूट अंतरावरावरील रामराव चव्हाण विद्यालयासमोरच पोलिसांचा बॅरिकेट टाकून कडक बंदोबस्त तैनात होता. कडक तपासणी केल्यानंतरच उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीस्थळाकडे सोडले जात होते.
निकाल ऐकण्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासूनच रामराव चव्हाण विद्यालयासमोर कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी उसळली होती. साडेअकरापर्यंत निकाल काही बाहेर येत नसल्यामुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. उमेदवार विजयी झाल्याचे वृत्त बाहेर कळताच एकच घोषणाबाजी होत होती. पहिल्यापासूनच भाजप आणि राष्ट्रवादी पक्षांचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे कार्यकर्ते भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे झेंडे फडकावत आनंदोत्सव साजरा करीत होते.
विजयी उमेदवार बाहेर येताच विजयी घोषणाबाजीने परिसर दणाणला जात होता. भगव्या गुलालाची उधळण करीत कार्यकर्ते जल्लोष करीत होते. महेश तवले, सुभाष लोंढे आणि दिगंबर ढवण यांच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. जस जसा निकाल लागत तस तसे विजयी उमेदवार बाहेर पडत. बाहेर आल्यानंतर उमेदवारांची वाजत गाजत आणि गुलालाची उधळण करीत कार्यकर्ते जल्लोष करीत होते. दुपारी दोन अडीच वाजेपर्यंत विजयी उमेदवारांची मिरवणूक, गुलालाची उधळण आणि घोषणाबाजी सुरु होती. विजयी झालेले उमेदवार वाजत गाजत अहिल्यानगरकडे परतत होते. ठिकठिकाणी स्वागत, अभिनंदन स्वीकारत विजयी उमेदवार आपापल्या प्रभागात जात होते. प्रभागात देखील जोरदार मिरवणुका, गुलालाची उधळण सुरुच होती. कार्यर्त्यांची घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने अहिल्यानगर शहर रात्री उशीरापर्यंत दुमदुमत होते. आपला उमेदवार विजयी होणारच या आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांनी रामराव चव्हाण विद्यालय परिसरात मिरवणुकीसाठी चारचाकी वाहने, गुलालाच्या पिशव्या आणि ढोलीबाजाची व्यवस्था केली होती.
आशीर्वाद बंगल्यावर गुलालाची उधळण
मतमोजणी सुरु असतानाच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत पारिजात चौकातील आशीर्वाद बंगल्यात ठाण मांडून बसले होते. संपूर्ण निकाल जाहीर होताच या बंगल्यावरच गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नवनिर्वाचित नगरसेवक निखील वारे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.