करंजी: पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आपत्तीग्रस्त कुटुंबांनी विविध मागण्यांची प्रशासनाने दखल घेऊन पुढील महिन्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन स्थागित करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी करंजीत येऊन आपत्तीग्रस्त कुटुंबाशी सकारात्मक चर्चा करून त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाथर्डी येथे प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक गेऊन आपत्तीग्रस्तांना निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
करंजी ग्रामपंचायत कार्यालयात माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, सरपंच रफिक शेख, सुभाष आकोलकर, सुनील अकोलकर, बाळासाहेब पावशे, बाबासाहेब गाडेकर, भाऊसाहेब मोरे, राजेंद्र पारे, शिवाजी पारे, बाळासाहेब साखरे, मुरलीधर मोरे, महमद मणियार, बाबासाहेब खोसे, शेफिक शेख, राजू शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार डॉ. नाईक म्हणाले, नदीपात्रा जवळील अधिग्रहण केलेली संपूर्ण जागा निश्चित करण्यात येईल, नदीपात्रावर कोणीही खासगी पूल उभारू नये. याबाबत ठोस भूमिका घेण्यात येईल, उत्तरेश्वर मंदिराजवळ नवीन पूल उभारण्याबाबत व संरक्षक भिंत बांधण्याबाबत चर्चा केली जाईल, घोरदरा पाझर तलावाचा सांडवा विरुद्ध बाजूने घेण्यासाठी देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, काही आपत्तीग्रस्तांना दुसऱ्या टप्प्याचे देखील मदत पोहोचलेली आहे.
उर्वरित आपत्तीग्रस्तांना निश्चितपणे मदत देण्याची शासनाची भूमिका राहील. आपत्तीग्रस्तांच्या ज्या काही मागण्या आहेत. त्याबाबत प्रशासनाची सकारात्मक भूमिका असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग, जलसंधारण, पंचायत समिती या सर्व प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पाथर्डीला घेऊन आपत्तीग्रस्तांच्या प्रश्नावर निश्चितपणे तोडगा काढला जाईल. त्यामुळे प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे करंजी येथील आपत्तीग्रस्तानी आंदोलन स्थगित केल्याचे सुभाष आकोलकर, बाबासाहेब गाडेकर बाळासाहेब पावसे यांनी सांगितले.