

श्रीगोंदा: शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीत ऐनवेळी मेघा संदीप औटी यांची वर्णी लागल्याने अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी धक्कातंत्राचा अवलंब केल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या निवडीनंतर प्रशांत दरेकर यांनी कारखान्याच्या संचालकपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी कारखान्याच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याने उपाध्यक्षपदही रिक्त झाले होते. नवीन उपाध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी(ता.23) प्रादेशिक सहसंचालक(साखर) संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. तीत उपाध्यक्षपदासाठी मेघा संदीप औटी यांचे एकमेव नाव आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दरम्यान, होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता राजेंद्र नागवडे यांचे सुपुत्र दिग्विजय नागवडे हे बेलवंडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू इच्छित आहेत. उपाध्यक्षपदासाठी बेलवंडी येथील सावता हिरवे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, नागवडे यांनी धक्कातंत्राचा अवलंब करीत मेघा औटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र, ही निवड जाहीर होताच प्रशांत दरेकर यांनी कारखान्याच्या संचालकपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.
आत्मसन्मान दुखावला गेला अन् दरेकर यांचा राजीनामा
उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर प्रशांत दरेकर हे एका शेतकऱ्याचे काम घेऊन कारखान्याचा निर्णय घेणाऱ्या यंत्रणेकडे गेले होते . मात्र त्या शेतकऱ्याचे काम धुडकावून लावल्याने नाराज झालेल्या दरेकर यांनी संचालक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. ज्या सभासदांनी आपल्यावर विश्वास ठेवला. संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली .त्या शेतकऱ्यांचे काम आपल्या हातून होणार नसेल तर त्या पदावर राहण्यात काय अर्थ आहे? असा सवालही दरेकर यांनी राजीनामा देताना केला असल्याची चर्चा आहे.
मी व्यक्तिगत कारणाने कारखान्याच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. माझ्या राजीनाम्याला कोणतेही राजकीय संदर्भ नाहीत.
प्रशांत दरेकर, संचालक, नागवडे कारखाना
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व कारखान्याच्या गाळप हंगामाच्या 51च्या वर्षानिमित्त उपाध्यक्षपदी महिला संचालकांना संधी देण्याचा निर्णय आम्ही एकविचाराने घेतला आहे.
राजेंद्र नागवडे, अध्यक्ष, नागवडे कारखाना
फकारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी माझ्यावर विश्वास दाखवीत उपाध्यक्षपदाची संधी दिली आहे. नागवडे व सभासदांच्या विश्वासाला साजेसा कारभार करू.
मेघा औटी, नूतन उपाध्यक्ष, नागवडे कारखाना