

संगमनेर: जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिजाचे विनापरवाना उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. वारंवार अशा गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पोलिस व महसूल प्रशासनाला दिले आहेत.
संगमनेर तालुक्यातील अवैध वाळू उपशा बाबतच्या झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी चांगलेच आक्रमक होते. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. या बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी संगमनेर तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांचा आणि प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अवैध व्यवसायांबाबत प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेण्याच्या सूचना केल्या. वाळू तस्करांवर वचक निर्माण करण्यासाठी केवळ दंड न आकारता, सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या मोडीत काढण्यासाठी कडक कायदेशीर कलमांचा वापर करावा अशा शब्दात त्यांनी आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना दिले.
प्रशासकीय कामांच्या पाहणीसोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. साकुर व खंडेरायवाडी येथील शेतकऱ्यांच्या पाहणी केली. केंद्र व राज्य शासनाच्या ‘ग्रीस्टॅक’ योजनेचे महत्त्व अधोरेखित करत, हे काम मोहीम स्तरावर आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले. गावातील प्रस्तावित स्मशानभूमीच्या जागेचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. कासारा दुमाला येथील महिला बचत गटाच्या दुग्ध प्रक्रिया केंद्राला भेट दिली असता, महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. निमोण येथील नियोजित सौरऊर्जा प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली.
विविध समस्यांचा घेतला आढावा
संगमनेर शहराच्या विकासाशी निगडित असलेल्या श्वान निर्बीजीकरण केंद्र, ट्रक टर्मिनलचा प्रलंबित प्रश्न आणि एमआयडीसीमधील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतही त्यांनी सकारात्मक चर्चा केली. एमआयडीसीमधील पायाभूत सुविधा आणि उद्योगांना लागणारे सहकार्य याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना तातडीने पावले उचलण्यास सांगितले.