Vikhe vs Thorat Pudhari
अहिल्यानगर

Zilla Parishad Election: विखे–थोरात गटाची जोर्वेमध्ये थेट लढत; उमेदवारांची शोधाशोध जोरात

संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद जोर्वे गटात प्रतिष्ठेची जंग; दिवाळीनंतर प्रचाराचा रंग उधळला

पुढारी वृत्तसेवा

राजेश गायकवाड

आश्वी: नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे दिवाळीनंतर फटाके फुटणार आहेत. यातील जोर्वे जिल्हा परिषद गट हा आजी माजी मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे या गटातील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, दिवाळीचा मुहूर्त साधून, इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारापर्यंत शुभेच्छा, भेटवस्तू पोहचवताना इच्छूक दिसत असल्याने रंगत वाढत आहे.  (Latest Ahilyanagar News)

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदार संघातील असणारा जोर्वे जिल्हा परिषद गटाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग व जोर्वे व अंभोरे गणाकरिता सर्व साधारण आरक्षण निघाल्याने काँग्रेस व भाजपसह विविध पक्षाच्या इच्छुकांची चाचपणी सुरू झाली. हा गट म्हणजे थोरातांचे माहेर घर, तर विखे पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे विखे-थोरात कार्यकर्त्यांची सरळसरळ लढत असून दोन्हीकडूनही विविध नावांची जोरदार चर्चा होताना दिसत असून याकडे संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष लागणार आहे.

जोर्वे जिल्हा परिषद गट म्हणजे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाचा जि. प. गट असून या गटात येणारी निम्मी गावे हे संगमनेर मतदारसंघातील, तर निम्मी गावे हे शिर्डी मतदारसंघातील आहेत. या दोन्ही नेत्यांचा मोठा प्रभाव या गटावर आहे. या भागात बहुतांश वर्षांपासून विखे आणि परिवाराशी येथील लोकांची नाळ जुळलेली असल्याने मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कार्यकर्ते संच मोठा प्रमाणात आहे, तर स्वतः चे गाव, विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून व जुन्या ऋणानुबंधाने बाळासाहेब थोरात यांचा परिसरावर प्रभाव आहे.

थोरात विखे एकत्र असो अथवा नसो 2019 पर्यंत सोयीचे निवडणुकीचे राजकारण दिसले. मात्र, मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विखे थोरात काँग्रेस पक्षात असताना सुद्धा विखेंनी जोर्वे गटात, तर थोरातांनी आश्वी गटात अपक्ष उमेदवार देवून कार्यकर्त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दोन्ही ठिकाणी अपक्षाची डाळ शिजली नाही. मात्र, विरोधाची मात्र ठिणगी पडली. कुठलाही कार्यक्रम असो एकमेकांवर टीका टिपणी दिसून येत आहे. आता दोन्ही नेत्यांची भूमिका वेगळी, पक्ष वेगळा असल्याने मिनी मंत्रालयात सत्ता मिळविण्यासाठी बालेकिल्ल्यापासून संपूर्ण जिल्हयात जोरदार प्रयत्न होणार, यात तीळमात्र शंका नाही.

जोर्वे जिल्हा परिषद गट हा पाहिजे तसा सोयीस्कर नसून विविध जाती-धर्माचे, सुशिक्षित व सधन लोक असून राजकारणाविषयी जाणकार आहेत. हा बागायत भाग असताना सुद्धा विखे - थोरातांच्या भोवती कार्यकर्त्यांचे मोठे वलय दिसत आहे. सहकाराच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी आपले वर्चस्व निर्माण करून कार्यकर्ते तयार केले.

थोरात गटाकडून संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, डॉ.राजेंद्र कोल्हे, थोराताचे कट्टर विरोध म्हणून तालुक्यात नावाजलेले शरद नाना थोरात हे नुकतेचं थोरात गटात सामिल झाल्याने ते सुध्दा उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत.तर विखे गटाच्या गोकूळ दिघे हे आघाडीवर आहेत. मात्र इच्छुकांची गर्दी खूप आहे.

पंचायत समिती माजी विरोधी पक्ष नेते सरूनाथ उंबरकर हे सुध्दा इच्छुक असून महायुतीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादी करिता सोडावी, ही त्यांची मागणी आहे.

अंभोरे गणात ‌‘सर्वसाधारण‌’ इच्छुकांची भाऊगर्दी

जिल्हा परिषद जोर्वे गटातील अंभोरे गण हा सर्वसाधारण पुरुष निघाल्याने थोरात गटाकडून भास्कर खेमनर, विक्रमराजे थोरात, आण्णासाहेब खंडू जगनर, राहुल खेमनर, तुळशीराम मलगुंडे, संतोष नागरे तर विखे गटाकडून संदिपराव घुगे , प्रा. नानासाहेब तळेकर, रामभाऊ घुगे, अशोकराव खेमनर आदीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

जोर्वे गणात ओपनमध्ये फिल्डींग लागली

जोर्वे गणातून थोरात गटाकडून सुरेश थोरात, डॉ. राजेंद्र कोल्हे, ॲड रामदास शेजूळ तर विखे गटाकडून भाजपा जिल्हा सचिव सचिन शिंदे, दिलीप इंगळे, शिवाजीराव कोल्हे,गणेश भूसाळ तर रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आशिष शेळके आदीसह अनेकजण इच्छुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT