

श्रीरामपूर: तालुक्यातील खानापूर शिवारात विजयादशमी दसऱ्याचे मुहुर्तावर लावलेल्या पिंजऱ्यात शनिवार, रविवार, सोमवार सलग तीन दिवस तीन बिबटे अडकल्याने शेतकऱ्यांची सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्या जेरबंद झाल्याने काल मंग़ळवारी वस्तीवरील शाळकरी मुले, शेतकरी, ग्रामस्थांनी भितीमुक्त होऊन दिवाळी साजरी केली. (Latest Ahilyanagar News)
श्रीरामपूर तालुक्यातील गोदाकाठच्या खानापूर शिवारात भामाठान रस्त्यावर दसऱ्याचे दोन दिवस अगोदर शाळकरी मुलांना रस्त्यावरून तीन बिबटे आडवे जाताना आढळले. धास्तावलेल्या शाळकरी मुलांना आजुबाजुच्या वस्त्यावरील शेतकऱ्यांनी धीर देऊन त्यांच्या घरी सोडले. ही वार्ता परिसरात पसरल्याने तरूणांनी पशुवैद्यकिय डॉ.दादासाहेब आदिक यांच्या सहकार्याने वनरक्षक राहुल कानडे यांच्याशी संपर्क साधला.
वन विभागाच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे पिंजरा एका स्पॉटवर आहे. त्या ठिकाणाहून तुम्हाला तुमच्या वाहनातून घेऊन जावा लागेल, असे कळवले. खानापुरच्या तरूणांनी टॅक्टर ट्रालीमधुन बोरावके फार्म ब्राम्हणगाव शिवार येथून पिंजरा आणला. दसऱ्याचे दिवशी पिंजरा बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात लावण्यात आला. आठवडाभर पिंजऱ्यात बिबट्या अडकत नसल्याने शाळकरी मुलांसह परिसरातील शेतकऱ्यात दहशत घबराटीचे वातावरण होते.
वनसंरक्षक विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सांगितले शेळी,बोकड भक्ष्य पिंजऱ्यात कोंडल्याशिवाय बिबट्या अडकणार नाही. या भक्ष्याची व्यवस्थाही तुम्हालाच करावी लागणार आहे. लोकवर्गणीस प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर भाऊसाहेब जोर्वेकर या शेतकऱ्याने स्वत:चा बोकड आणुन पिंजऱ्यात कोंडला. पहिले तीन-चार दिवस बोकडालाच पिंजऱ्यात चारा टाकण्याची काळजीही त्यांना घ्यावी लागली.
अधुनमधुन याचे कुत्रे खाल्ले याची शेळी खाल्ली अशा बातम्याने रहिवाशांच्या चिंतेत वाढ होत होती. दरम्यान, शनिवार पहाटे एक वर्ष वयाचा बिबट्या पिंजऱ्यात अलगद अडकला. वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी पिंजरा जागेवर ठेवून दुसऱ्या पिंजऱ्यातून बिबट्यास हलवले. दुसऱ्या दिवशी रविवारी पहाटे एक वर्षाच्या दुसरा बिबट्याचा पिंजऱ्यात सापडला.
त्यापाठोपाठ तिसऱ्या दिवशी सोमवारी पहाटे सैरभैर झालेली या जुळ्या बिबट्याची धिप्पाड आई मादी देखील पिंजऱ्यात अडकल्याची दिसली. शाळकरी मुलांना जे तीन बिबटे आढळले, ते तिन्हीही पिंजऱ्यात अडकल्याने, परिसरातील बिबट्याची भितीचे वातावरण दूर झाल्याने दिवाळी उत्साहात साजरी झाल्याचे दिसले. या बिबट्याचे सर्च ऑपरेशन कामी वनविभाचे अधिकारी कर्मचारी यांना डॉ. दादासाहेब आदिक, ॲड वरुण आदिक, महेश आदिक, अनिल चौधरी, शरद आदिक, भाऊसाहेब जोर्वेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.