Solar Pudhari
अहिल्यानगर

Jeur Solar Project Controversy: जेऊरमध्ये सौरऊर्जा प्रकल्पावरून वाद; ग्रामस्थांचा मनमानी कामाचा आरोप

हद्द निश्चितीशिवाय खांब उभारणीचा विरोध; चौकशी व काम थांबविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर येथे घुरुडी डोंगरावर सुरू असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचे नियोजनाअभावी मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. जेऊर येथील घुरुडी डोंगरावर गट क्रमांक 117 मध्ये 31 एकर सरकारी जागेवर मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम जोरात सुरू आहे. प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल व प्रकल्प शासनाचा असल्याचे सांगत संबंधित कंपनी ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.

कंपनीला सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी संबंधित जागेची हद्द निश्चित करून घेण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, हद्द निश्चित न करता काम सुरू करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायतीला याबाबत कोणतीही पूव सूचना देण्यात आली नाही. केवळ काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने पोलिसांचा धाक दाखवून व शासनाचे काम असल्याचे सांगून मनमानी सुरु आहे. ज्या रस्त्यावर पोल उभारणी सुरू आहे, त्या रस्त्याची अधिकृत मोजणी व हद्द निश्चिती अत्यावश्यक असून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. कोणतीही हद्द निश्चिती न करता रस्त्यावर खांब उभारणी करण्याचे काम सुरू आहे.

बहिरवाडी रस्त्यालगत मागील महिन्यात वीजवाहिनी साठी खांब उभरले होते. परंतु स्थानिकांचा विरोध व बांधकाम विभागाचे पत्र, यामुळे ठेकेदाराला काम बंद करावे लागले. उभारलेले खांब पुन्हा काढून घेण्यात आले. यावरून संबंधित प्रकल्प उभारताना कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे व दडपशाहीने शासनाचे काम म्हणून धाक दाखवत मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

बहिरवाडी रस्त्यालगतचे खांब हटविल्यानंतर जुन्या इमामपूर (खोल ओढा) रस्त्यालगत खांब उभारणीचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले होते. सदर रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. रस्त्याची अधिकृत मोजणी व हद्द निश्चित झाली नाही. अशा परिस्थितीत खांब उभारणे चुकीचे व धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे रस्त्याचे हद्द निश्चिती झाल्याशिवाय वीज वाहिन्यांचे खांब उभारू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

सदर रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून डांबरीकरणासाठी नागरिकांचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दखल घेऊन बांधकाम विभागास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा स्थितीत रस्त्यावर खांब उभारल्यास नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रथम रस्त्याची मोजणी करून हद्द निश्चित करूनच काम करण्याची मागणी आहे.

जेऊर येथील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्णपणे मनमानी पद्धतीने सुरू असून ते तत्काळ थांबवा. संबंधित कंपनीला परवानगी देताना दिलेल्या अटी व नियमांचे पूर्णपणे पालन झाले आहे किंवा नाही, याचीही चौकशी करा. तसेच रस्त्याचे हद्द निश्चित करूनच वीज वाहिन्यांचे खांब उभारावेत, अशी मागणी अजय पवार, अशोक पवार, पांडुरंग पवार, रवींद्र पवार, बाळासाहेब शिंदे, संपत शिंदे, संकेत शिंदे, शरद शिंदे, सौरभ शिंदे, सुरज ससे, महेश शिंदे, सोनाली पवार, विमल पवार, मीना पवार, अश्विनी ससे, जयश्री पवार, निर्मला ससे, गणेश ससे, दिनेश ससे, नंदू तोडमल, अशोक तोडमल, मीना शिंदे, स्वाती शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

प्रकल्पातील चोरीचाही तपास लावा !

सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असतानाच येथील कॉपरची केबल चोरीस गेली. हा प्रकल्प परिसरात कायमस्वरूपी राहणार असून येथे काम सुरू असताना चोरीची घटना घडणे निंदनीय आहे. त्यामुळे सदर चोरीची तपास लावून आरोपींना अटक करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

सौरऊर्जा प्रकल्पाचे काम करताना ठेकेदार कंपनीकडून नियोजन झाले नाही. त्यामुळेच बहिरवाडी रस्त्यालगत उभरलेले खांब काढण्याची वेळ ठेकेदारावर आली. त्यानंतर मनमानी पद्धतीने रस्त्याची हद्द निश्चित न करताच जुन्या इमामपूर रस्त्यावर कांब उभरण्याचे काम सुरू करण्यात आले. सदर रस्त्याची हद्द निश्चित झाल्याशिवाय कंपनीने काम करू नये.
अजय पवार, ग्रामस्थ, जेऊर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT