नगर तालुका: जेऊर परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेसकडे जाणारे रस्ते सध्या रोडरोमिओंच्या उपद्रवामुळे विद्यार्थिनींसाठी धोकादायक ठरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी (दि. २७) गावातील नामांकित विद्यालय सुटल्यानंतर मुंजोबा चौकात दहावीच्या एका विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे रोडरोमिओंचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेला मुलींच्या छेडछाडीची किनार असल्याची परिसरात चर्चा असून, रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जेऊर येथे बहिरवाडी, वाघवाडी, तोडमलवाडी, ससेवाडी, चापेवाडी, इमामपूर, ठोंबरे वस्ती, शेटे वस्ती, धनगरवाडी, आढाववाडी, तसेच इतर वाड्या-वस्त्यांवरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी ये-जा करतात. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत काही तरुणांकडून भरधाव दुचाकी चालवणे, मुलींना कट मारणे, अश्लील हावभाव करणे, पाठलाग करणे, तसेच दारूच्या नशेत धिंगाणा घालण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याची तक्रार आहे. दहावीच्या मुलावर झालेल्या हल्ल्यात मुलाच्या डोळ्याच्या वर गंभीर जखम झाली आहे.
यापूर्वी विद्यालय प्रशासन, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात निवेदने देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. शिक्षकांना दमदाटी करणे, तसेच तरुणांमध्ये आपापसांत मारहाणीचे प्रकारही घडलेले आहेत.
परिसरातील अनेक रस्ते निर्जन असल्याने विद्यार्थिनींना अधिक असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे अनेक पालक स्वतःची कामे बाजूला ठेवून मुलींना शाळेत सोडण्यासाठी व आणण्यासाठी येत असल्याचे चित्र आहे. शिक्षणात अडथळा येईल किंवा बदनामी होईल या भीतीने अनेक विद्यार्थिनी घडलेल्या घटना घरी किंवा शाळेत सांगत नसल्याचेही बोलले जात आहे. याचाच गैरफायदा काही समाजकंटक घेत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मंजोबा चौकातील ताज्या घटनेनंतर पंचक्रोशीतून रोडरोमिओंविरोधात विशेष मोहीम राबवावी, शाळांच्या वेळेत पोलिस गस्त वाढवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सेफ झोनची अपेक्षा!
रोडरोमिओंवर तातडीने कठोर कारवाई करावी. निर्जन रस्त्यांवर नियमित गस्त वाढवावी. विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे. शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासेस परिसर ‘सेफ झोन’ घोषित करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.