

अकोले: अकोले नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवक उमेदवारांनी माघार घेतली आहे. दरम्यान, भाजपाच्या माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी विरोधात भाजपाच्या नगरसेविका वैष्णवी धुमाळ यांच्या मध्ये ३१ जुलैला लढत होणार आहे.
अकोले नगरपंचायत नगराध्यक्ष बाळासहेब वडजे यांच्याविरुद्ध अविश्वास मंजूर झाल्यानंतर नवीन नगराध्यक्ष निवड कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जाहीर केला. त्यानुसार सोमवारी ४ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काल मंगळवारी माघारीच्या दिवशी प्रतिभा मनकर व काँग्रेसचे प्रदीपराज नाईकवाडी या दोन नगरसेवकांनी आपले अर्ज माघारी घेतले आहे.
तर ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता अकोले नगरपंचायत सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या आदेशाने संगमनेर उपविभागीय अधिकारी तथा पिठासन अधिकारी अरुण उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्या उपस्थित ही निवड प्रक्रिया होणार आहे. तर मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे सुनील सुकटे, साबीर सय्यद हे कामकाज करणार असून यावेळी हात उंचावून आवाजी मतदानाने मतदान होणार आहे.
नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांचा अविश्वास मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे आदेशाने नवीन नगराध्यक्ष निवड प्रक्रिया प्रांताधिकारी यांचे नेतृत्वाखाली सुरु झाली होती. तर भाजपाकडून माजी आ. पिचड यांच्या नेतृत्वात नगरसेविका वैष्णवी धुमाळ यांनी अर्ज दाखल केला. यावेळी नगरसेविका शीतल वैद्य, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले व काँग्रेस नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी, असे पाच नगरसेवक उपस्थित होते. मात्र भाजपाचे बंडखोर गटाकडुन भाजपाच्या गट नेत्या तमन्ना मोहसीन शेख यांचे नेतृत्वात भाजपा महिला आघाडी प्रदेश सचिव सोनाली चेतन नाईकवाडी यांनी १२ नगरसेवकांचे उपस्थितीत अर्ज दाखल दाखल केला.
याप्रसंगी माजी नगरसेवक परशराम शेळके, अर्किटेक्ट चेतनराव नाईकवाडी, राष्ट्रवादी किसान सेल प्रदेशाध्यक्ष वसंतराव मनकर, व्यापारी मोहसीन शेख, नवनाथ मोहिते, नगरसेविका प्रतिभा मनकर, जनाबाई मोहिते, विमल मंडलिक, श्वेताली रुपवते, माधुरी शेणकर, कविता शेळके, नगरसेवक नवनाथ शेटे, सागर चौधरी, हितेश कुंभार, आरिफ शेख आदी उपस्थित होते.
माजी आ. पिचड तळ ठोकून
अकोले नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत रंगत वाढली असून नगराध्यक्ष पदासाठी शर्यतीत भाजपमध्ये दोन गट पडले आहे. तर नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही गटाने आप आपली व्युव्हरचना आखली असल्याने माजी आ. वैभव पिचड सोमवारपासून अकोले शहरात तळ ठोकून आहे. आणि भाजप पक्ष कार्यालयातुन बहुमताची जुळवा-जुळव करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे भाजपातील बंडखोर गटाचे १२ नगरसेवकही सहलीसाठी अज्ञात स्थळी रवाना करून माजी नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांनी खबरदारी घेतली आहे.