नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर गावातील अतिक्रमणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणास्तव चर्चेत आला होता. नाशिक विभागीय आयुक्तांनी सीना नदी पात्रातील अतिक्रमण हटविण्याचा आदेश सुमारे दहा वर्षांपूर्वी दिला आहे. तसेच गेल्या 21 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार मागील महिन्यात सीना नदीपात्रातील अतिक्रमणात असलेली मुख्य बाजारपेठ हटविण्यात आली आहे. ग्रामदैवत देवी बायजामाता रस्ता परिसरातील अतिक्रमण 12 जानेवारीला हटविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु तो निर्णय आता लांबणीवर गेला असून सोमवारी (दि. 19) अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली.
जेऊरचे आराध्य दैवत देवी बायजामाता डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. गावामधून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना, तसेच नागरिक, शेतकऱ्यांना अतिक्रमणांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शाळेतील विद्यार्थीही या रस्त्याने मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असतात. याच परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचा ही आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. तरी देखील येथील गोवंश हत्या अद्याप बंद झाली नाही. त्यामुळे या परिसरात असणारे अवैध कत्तलखानेही भुईसपाट करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
12 जानेवारी रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार होती. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बंदोबस्त, तसेच नाथभक्तांच्या दिंडीचा बंदोबस्त, यामुळे पोलिस प्रशासनावर कामाचा जास्त भार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर जेऊर येथील अतिक्रमण हटाव मोहीम सोमवारी (दि. 19) राबविण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समजली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यामुळे पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बायजामाता डोंगर पायथ्याशी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली असून पक्की बांधकामे करण्यात आली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील वेळोवेळी अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. परंतु नोटिसा देऊनही अतिक्रमणधारकांनी स्वतःचे अतिक्रमण हटविलेले नाही. नोटिसांची मुदत संपून गेली तरी अतिक्रमण जैसे थे आहे. परिसरात वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये देखील मोठा रोष पहावयास मिळत होता. त्यामुळे प्रशासनाने आक्रमक होत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने अतिक्रमण मोहीम सातत्याने राबविली पाहिजे. प्रशासनाचा अतिक्रमण हटविण्याचा निर्णय हा कौतुकास्पद असून ही कारवाई तात्पुरती न राहता दीर्घकालीन धोरणाचा भाग ठरावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.
जागेचे पुरावे द्या!
सदर ठिकाणी अतिक्रमणे हटविताना प्रत्येकाने आपण राहत असलेली तसेच वापरात असलेल्या जागेचे उतारे घेऊन उपस्थित राहण्याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यानंतर आपल्या जागे संदर्भातील पुरावे संबंधित अधिकाऱ्यांना दाखवावे लागणार आहेत, अन्यथा इतर सर्व ठिकाणच्या अतिक्रमण पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
अवैध कत्तलखाने भुईसपाट करण्याची मागणी!
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे नुकतेच सर्व अनाधिकृत कत्तलखाने प्रशासन व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सील करण्यात आले आहेत. जेऊर मध्येही गोवंश हत्या होत असल्याचे अनेक वेळा पोलिसांच्या कारवाईतून समोर आलेले आहे. त्यामुळे ग्रामदैवत बायजामाता धार्मिक स्थळाच्या पायथ्याशी सुरू असलेले अवैध कत्तलखाने भुईसपाट करण्याची मागणी पंचक्रोशीतील नागरिकांमधून होत आहे.
या परिसरातही अतिक्रमण मोहीम राबवा!
जेऊर गावात जाणारा मुख्य रस्ता, महावितरण कंपनी चौक ते सीना नदीपात्र रस्ता, गावांतर्गत रस्ते, वाघवाडी गावठाण, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, साळवे वस्ती रस्ता, सकस आहार विहीर परिसर, बायजामाता डोंगर परिसर, जुनी नगर वाट याचबरोबर विविध शासकीय जागेवरील अतिक्रमण प्रशासनाच्या रडारवर असून त्यांच्यावरही लवकर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.