नगर तालुका: नगर तालुक्यातील जेऊर येथे सीना नदीपात्रातील सुमारे 40 ते 50 वर्षांपूर्वीची अतिक्रमणे मागील महिन्यात हटविल्यानंतर प्रशासनाने आपला मोर्चा सीना नदीपात्र ते बायजामाता डोंगर परिसर रस्त्यालगतच्या अतिक्रमणांनांकडे वळविला आहे. ग्रामपंचायतच्या वतीने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊनही अतिक्रमणे हटविली नाहीत.
सोमवारी (दि. 19) सदर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्तात मोहीम राबविण्यात येणार होती. एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सोमवारी अतिक्रममित भागास भेट देऊन अतिक्रमणधारकांशी चर्चा केली. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाशी संवाद साधला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अन्यथा कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा ही इशारा देण्यात आला.
संबंधित अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे असणाऱ्या जागेबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने हद्द निश्चित करून देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांनी अतिक्रमण हटविले नाही, तर पोलिस बंदोबस्तात ग्रामपंचायतीचा बुलडोझर चालणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समजली. सीना नदीपात्र ते बायजामाता डोंगर रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. अतिक्रमणांमुळे ग्रामदैवत देवी बायजामातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना, शाळेतील विद्यार्थी, तसेच ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या परिसरातील अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने मंगळवारी (दि.20) हद्द निश्चित करून देण्यात येणार असल्याची माहिती समजली. त्यानंतर संबंधित अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे हटविली नाही, तर प्रशासनाच्या वतीने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. संपूर्ण जेऊरला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. जेऊर परिसरातील सर्व अतिक्रमणे हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण अतिक्रमणे हटविण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
पोलिस अधिकाऱ्याची तत्परता
जेऊर येथे सीना नदीपात्र ते बायजामाता डोंगर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याबाबत सोमवारी (दि. 19) अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार होती. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत ग्रामपंचायत प्रशासन व अतिक्रमणधारकांशी संवाद साधला. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शांततेच्या मार्गाने यावर निर्णय होणार आहे.