Jamkhed Onion Farmers Crisis Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed Onion Farmers Crisis: जामखेडमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संकटात; अवकाळी पाऊस आणि भावघसरणीचा दुहेरी फटका

भिजलेल्या कांद्यामुळे मोठे नुकसान; उत्पादन खर्चही निघणे कठीण, शासनाकडे मदतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: तालुक्यातील कांदाउत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत. आधीच बाजारभाव घसरल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसाने आणखी एक मोठा आघात केला आहे.

गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. अनेक शेतकऱ्यांनी काढणी करून कांदा शेतात वाळवण्यासाठी ठेवला होता. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे हा कांदा पाण्यात भिजून त्याची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे कांदा सडण्याची भीती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यावर्षी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचा पुरवठा जास्त झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या बाजारात कांद्याला केवळ 10 रुपये किलो इतकाच दर मिळत आहे. हा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

अशा परिस्थितीत अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कांद्यामुळे नुकसान अधिकच वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा विक्री योग्य राहिला नाही, तर काहींना कमी दरात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, तसेच कांद्याला योग्य दर मिळावा, यासाठी बाजार हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. साठवणूक सुविधांबरोबर पीक विम्याअंतर्गत नुकसान भरपाई देण्याचीही गरज व्यक्त करण्यात येत आहे.

एकंदरीत, कमी बाजारभाव आणि अवकाळी पावसाच्या दुहेरी संकटांमुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी जेरीस आले आहेत. शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आम्ही मोठ्या मेहनतीने कांद्याचे पीक घेतले. यावर्षी 1 हजार गोणी उत्पादन झाले, पण बाजारात भावच मिळाला नाही. त्यातच काढणी करून ठेवलेला कांदा पावसामुळे भिजला. आता तो सडण्याच्या मार्गावर आहे. उत्पादन खर्चही निघणार नाही. शासनाने तातडीने मदत करावी, अन्यथा आर्थिक संकट ओढवेल.
शिवाजी कोल्हे, कांदाउत्पादक, जवळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT