Jamkhed Mohari Dam Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed Mohari Dam Repair Tender: मोहरी तलाव दुरुस्तीला गती; 3.02 कोटींची निविदा जाहीर

रोहित पवारांच्या पाठपुराव्याला यश; 10 गावांच्या पाणी व सिंचन प्रश्नाला दिलासा मिळणार

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: तालुक्यातील मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने अवघ्या 10 दिवसांत 3 कोटी 2 लाख 52 हजार रुपयांची ई-निविदा जाहीर केली आहे. या निर्णयामुळे खर्डा परिसरातील सुमारे 10 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

अलीकडील मुसळधार पावसामुळे मोहरी धरणाच्या भिंतीला मोठे भगदाड पडले होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी धरण सुरक्षा पुनरावलोकन समितीची तातडीने पाहणी व्हावी, यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार 13 एप्रिल रोजी तज्ज्ञ समितीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. त्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे यांच्याशी झालेल्या चर्चेचा सकारात्मक परिणाम म्हणून 23 एप्रिल रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली.

या कामासाठी 3 कोटी 2 लाख 52 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून, निविदा भरण्याची मुदत एप्रिलपर्यंत आहे. निविदा 4 मे रोजी उघडली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता, पात्र आणि सक्षम ठेकेदाराची निवड होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. मोहरी तलाव हा खर्डा परिसरातील 10 गावांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. शेती सिंचनासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. दुष्काळाच्या काळात टँकर भरण्यासाठीही हाच तलाव सर्वात विश्वासार्ह स्रोत मानला जातो. यंदा पावसाचा अंदाज कमी असल्याने उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी धरणाची दुरुस्ती वेळेत होणे आवश्यक आहे.

कुकडी पाटबंधारे विभाग, श्रीगोंदा येथील कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांनी ही निविदा प्रसिद्ध केली आहे. मेच्या मध्यापर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे जामखेड तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT