नगर: जामखेड येथे पैलवान सागर किसन मोहळकर याच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून एक गावठी व एक 1 जिवंत काडतूस हस्तगत केले. अभिमन्यू महादेव पोते (वय 24, रा. भुतवडा रोड, लाईट बोर्ड शेजारी, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांंनी सांगितले, की 4 मार्च 2026 रोजी रात्री नूरानी कॉलनी येथे अज्ञात आरोपींनी मोटारसायकलवरून येऊन मोहळकरवर गावठी पिस्तुलातून गोळअया झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. किसन चांगदेव मोहळकर यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहळकरच्या पूर्ववैमनस्याबाबत माहिती घेऊन घटनास्थळाची पाहणी ककेली. सीसीटीव्ही ताब्यात घेऊन तांत्रिक तपास केला. त्यात हा गुन्हा अभिमन्यू पोते व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. अभिमन्यू जिक्री (ता. जामखेड) शिवारात असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
त्याने चार्ली ऊर्फ माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे, चिन्या (पूर्ण नाव माहीत नाही; सर्व (रा. कोथरुड, पुणे) यांच्या साथीने हा गुन्हा केल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. मागील वादाच्या कारणावरून मोहळकरला ठार मारण्यासाठी सर्व जण जामखेडला गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याची कबुली त्याने दिली. पोतेकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतूस, मोबाईल व दुचाकी असा 90 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
आरोपीला जामखेड पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक हरीश भोये, उपनिरीक्षक महादेव गुट्टे, अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, अतुल लोटके, विष्णू भागवत, गणेश लोंढे, श्याम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, योगेश कर्डिले, अमृत आढाव, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, भगवान धुळे यांची पथकांनी ही कारवाई केली.